
काही दिवसांपूर्वीच इलॉन मस्कने ट्विटरची सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली. यानंतर बॉस होताच त्याने घेतलेल्या निर्णयांची जोरदार चर्चा सुरु झाली. यातच त्याने जाहीर केलेला एक निर्णय म्हणजे ट्विटर ब्लू टिकसाठी मासिक शुल्क आकारण्याचा निर्णय चांगलाच गाजत आहे. त्याने यासंबंधित ट्विट करताच ट्विटर वापरणाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.
ट्विटर ब्लू टिकसाठी दरमहा ८ डॉलर म्हणजेच सुमारे ६६० रुपये आकारण्याची घोषणा केली होती. सोशल मीडियावर झालेल्या टीकेनंतरदेखील इलॉन मस्क आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे ट्विट केले आहे. इलॉन मस्कने ट्विट करत म्हंटले आहे की, "तक्रार कारण्यांनी तक्रारी करत रहा, पण पैसे द्यावेच लागणार" असा इशारा दिला आहे. यापूर्वीही अनेक ट्विट करत इलॉन मस्कने याबद्दल स्वतःची उद्दिष्टे स्पष्ट केली आहेत. कोणीही पैसे देऊन ब्लू टिक मिळवू शकतो मात्र, ब्लू टिक वापरकर्त्यांना अनेक फायदे देखील दिले जातील.