

पॅरिस : भारत आणि फ्रान्स यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्यासाठी फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्यूएल मॅक्रॉन हे सोमवारपासून तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात दोन्ही देशांत करारांवर स्वाक्षऱ्या होणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्यावर्षी फ्रान्सचा दौरा केला होता. त्यानंतर मॅक्रॉन यांचा दौरा होत आहे. मॅक्रॉन यांच्यासोबत त्यांची पत्नी ब्रिगिट याही दौऱ्यावर येणार आहेत.
परराष्ट्र खात्याच्या माहितीनुसार, राष्ट्रपती मॅक्रॉन हे सोमवारी रात्री ११.३० वाजता मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरतील. त्यांच्या अधिकृत दौऱ्याची सुरुवात १७ फेब्रुवारीपासून होईल. १७ तारखेला राष्ट्रपती मॅक्रॉन व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बैठक होणार आहे. यावेळी अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होतील. त्यानंतर संयुक्त निवेदन जारी केले जाईल.
सोमवारी सायंकाळी हॉटेल ताजमहालमध्ये भारत-फ्रान्स इनोव्हेशन फोरममध्ये सहभागी होतील. त्यानंतर गेटवे ऑफ इंडियावरील सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होतील, तर १८ व १९ फेब्रुवारीला राष्ट्रपती मॅक्रॉन हे दिल्लीच्या ‘भारत मंडपम’ येथील कार्यक्रमात सहभागी होतील. ते ‘एआय इम्पॅक्ट शिखर परिषदे’च्या उद्घाटन समारंभात सहभागी होतील. यावेळी उपस्थित राहणाऱ्या अन्य देशांच्या प्रतिनिधींसोबत ते बैठक करतील. १९ फेब्रुवारीला ते फ्रान्सला रवाना होतील.
या दौऱ्यात पंतप्रधान मोदी व फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्रॉन हे ‘भारत-फ्रान्स इयर ऑफ इनोव्हेशन’चे उद्घाटन करतील. दोन्ही देशांमध्ये २०४७ पर्यंत सहकार्य वाढीबाबत चर्चा होईल. तसेच हिंद-प्रशांत क्षेत्रात परस्पर क्षेत्रीय व वैश्विक मुद्द्यावर चर्चा केली जाणार आहे.