मिझोराममधून मैतेईंचे पलायन

मिझो दहशतवादी संघटनेच्या धमकीमुळे सैरभैर
मिझोराममधून मैतेईंचे पलायन

ऐझ्वाल : मणिपूरमध्ये अत्याचार झालेल्या आदिवासी महिलांबाबत सहानुभूती बाळगणाऱ्या मिझो दहशतवादी संघटनेने दिलेल्या धमकीनंतर मिझोराममधून मैतेई समुदायाने मणिपूरमध्ये पलायन करण्यास सुरुवात केली आहे, तर मैतेई समुदायाला मिझोरामच्या गृहखात्याने दिलासा देत अभय देण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही घाबरलेले मैतेई नागरिक राज्य सोडून निघाले आहेत. त्यांना सुरक्षितपणे इच्छित स्थळी पोहोचवण्यासाठी राज्य सरकारने खास विमानांची सोय करण्याची तयारी दाखवली आहे.

मणिपूरमधील कुकी झोमी आदिवासींबद्दल मिझोरामच्या मिझो लोकांमध्ये विशेष आत्मियता आहे. मणिपूरमध्ये कुकी झोमी महिलांवर सामूहिक अत्याचार झाल्याच्या घटनांमुळे मिझोराममधील मिझो लोक संतप्त झाले आहेत. मणिपूरमध्ये ३ मे रोजी हिंसाचार सुरू झाल्यापासून तेथील १२,५८४ कुकी-झोमी लोकांनी मिझोराममध्ये आश्रय घेतला आहे. मिझो नॅशनल फ्रंट (एमएनएफ) या पूर्वाश्रमीच्या दहशतवादी संघटनेचा सरकारबरोबर शांतता करार झाल्यानंतर पीस अकॉर्ड एमएनएफ रिटर्नीज असोसिएशन (पाम्रा) ही संघटना स्थापन करण्यात आली. या संघटनेने शुक्रवारी एक पत्रक जारी करून मिझोराममधील मैतेई नागरिकांना जीव प्रिय असेल तर त्यांनी राज्य सोडून जावे, अशी धमकी दिली. त्यानंतर शनिवारपासून मिझोराममधील सुमारे २००० मैतेई नागरिकांनी राज्य सोडून जाण्यास सुरुवात केली. हे मैतेई लोक आसामच्या बराक खोऱ्यातील मूळ निवासी आहेत.

मिझोरामच्या गृहखात्याने विविध ठिकाणी मैतेईंना संरक्षण पुरवून दिलासा देण्याचा प्रयत्न कोला. तसेच त्यांना राज्यात धोका नसल्याचेही सांगितले, पण तेवढ्याने मैतेईंचे समाधान झाले नाही. ते मोठ्या संख्येने मिझोराम सोडून जात आहेत. त्यांना इच्छित स्थळी सुरक्षित पोहोचवण्यासाठी मिझोराम सरकारने विशेष विमानांची सोय करण्याची तयारी दाखवली आहे. मिझोराम पोलिसांबरोबर झालेल्या चर्चेनंतर पाम्रा संघटनेने काहीसे नरमाईचे धोरण स्वीकारले. आपल्या निवेदनाचा चुकीचा अर्थ लावला गेला. मैतेई समुदायाच्या काळजीपोटी आम्ही निवेदन जारी केले होते, असा खुलासा त्यांच्या वतीने करण्यात आला आहे. दरम्यान, ४ मे रोजी मणिपूरच्या कांगपोकपी जिल्ह्यात जमावाने दोन कुकी-झोमी महिलांना विवस्त्र करून फिरवणे आणि त्यांच्यावर सामूहिक अत्याचार केल्याप्रकरणी सहाव्या आरोपीला अटक करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in