
माद्रिद : युरोपातील स्पेन, पोर्तुगाल, फ्रान्स, बेल्जियममध्ये सोमवारी भारतीय वेळेनुसार, सायंकाळी ४ वाजता बत्तीगुल झाली. यामुळे या देशातील मेट्रो, विमानतळ, रेल्वे आणि मोबाइल नेटवर्क ठप्प झाले.
अचानक वीज गेल्याने लाखो लोकांना काळोखात राहावे लागले. पोर्तुगालची राजधानी लिस्बन व स्पेनची राजधानी माद्रिदमधील मेट्रो रेल्वे बोगद्यात बंद पडल्या. त्यामुळे लाखो लोक अडकून पडले आहेत. संपूर्ण देशातील ट्रॅफिक सिग्नल यंत्रणा बंद पडली.
स्पेनच्या वीज ग्रीडच्या प्रमुखाने सांगितले की, वीजपुरवठा पूर्ववत होण्यासाठी १० तासांचा वेळ लागू शकतो. स्पेन सरकारने आपत्कालीन बैठक बोलावली असून परिस्थितीवर नजर ठेवली जात आहे. तर फ्रान्समध्ये काही मिनिटात वीज पूर्ववत झाली.
वीज गेल्याने रुग्णालयातील कामकाज ठप्प झाले. स्पेन व पोर्तुगालमध्ये रुग्णालयातील अनेक शस्त्रक्रिया पुढे ढकलाव्या लागल्या. तसेच मोबाइल नेटवर्क ठप्प झाल्याची तक्रार स्पेन व पोर्तुगालचे नागरिक करत होते. स्पेनमधील आंतरराष्ट्रीय विमानतळावरील वीज गेल्याने तेथील विमान वाहतूक रोखण्यात आली.
स्पेनच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, मोठ्या प्रमाणावर वीज गेल्याने यामागे सायबर हल्ल्याची शक्यता वर्तवली जात आहे.