
मॉस्को : रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या ताफ्यातील कारमध्ये रविवारी स्फोट झाला. हा स्फोट रशियाची गुप्तचर संस्था ‘एफएसबी’च्या मुख्यालयासमोर झाला. ही घटना घडली तेव्हा पुतिन यांची कार या ताफ्यात नव्हती. पुतिनही या कारच्या जवळ नव्हते. पुतिन हे नेहमीच लिमोझिन कार वापरतात.
या घटनेनंतर पुतिन यांच्या सुरक्षेबाबत राष्ट्राध्यक्ष कार्यालयात चिंता वाढली आहे. विशेष म्हणजे २६ मार्च रोजी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी दावा केला होता की, लवकरच पुतिन यांचा मृत्यू होणार आहे.
पुतिन यांच्या अंगरक्षकांना ३५ व्या वर्षानंतर निवृत्त केले जाते. निवृत्तीनंतर त्यांना गव्हर्नर, मंत्री किंवा विशेष दलात अधिकारी पद दिले जाते. तसेच एक अधिकारी पुतिन यांच्या जेवणाची चाचणी करतात. जेवणात विष दिले गेलेले नाही, याची खात्री केली जाते.
पुतिन यांना चारस्तरीय सुरक्षा
पुतिन यांची सुरक्षा चारस्तरीय असते. यात रशियन फेडरल सिक्युरिटी फोर्सचे सैनिक सामील असतात. त्यांच्याकडे कोणत्याही वॉरंटशिवाय चौकशी करणे, टेहळणी करणे, अटक करणे तसेच अन्य सरकारी संस्थांना आदेश देण्याचे अधिकार असतात. रस्त्यावरून जाताना पुतिन यांच्या ताफ्यात शस्त्रास्त्रांनी भरलेली गाडी असते. त्यात ‘एके-४७’, रणगाडाविरोधी ग्रेनेड लाँचर, विमानविरोधी क्षेपणास्त्र आदींचा समावेश असतो. पुतिन ज्यावेळी गर्दीत असतात तेव्हा त्यांच्या बाजूला ही चारस्तरीय सुरक्षा असते. तसेच पुतिन ज्या ठिकाणी जातात त्या बाजूला इमारतींच्या छतांवर स्नायपर्स बसलेले असतात.