

लाहोर : माजी आयएसआय प्रमुख फैज हमीद यांना पाकिस्तानच्या एका लष्करी न्यायालयाने १४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. ‘आयएसआय’च्या प्रमुखाला एवढी मोठी शिक्षा होण्याची ही पाकिस्तानच्या इतिहासातील पहिलीच घटना आहे.
इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजेंसचे (आयएसआय) लेफ्टनंट जनरल (निवृत्त) फैज हमीद यांना ‘ऑफिशियल सीक्रेट अॅक्ट’चे उल्लंघन केल्याप्रकरणी आणि इतर गंभीर आरोपांखाली दोषी ठरवण्यात आले आहे. ऑगस्ट २०२४ मध्ये ‘फील्ड जनरल कोर्ट मार्शल’द्वारे फैज हमीद यांच्याविरुद्ध कार्यवाही सुरू करण्यात आली होती. १५ महिने चाललेल्या या प्रक्रियेनंतर त्यांना दोषी ठरवण्यात आले आणि ११ डिसेंबरपासून ही शिक्षा लागू करण्यात आली आहे. त्यांच्यावर राजकीय कारवायांमध्ये सहभागी होणे, अधिकृत गुप्तता कायद्याचे उल्लंघन करून देशाच्या हितांना हानी पोहोचवणे, सरकारी अधिकार आणि संसाधनांचा गैरवापर करणे आणि लोकांना हानी पोहोचवण्याचे आरोप होते.
फैज हमीद यांना गेल्या वर्षी १२ ऑगस्ट रोजी गृहनिर्माण घोटाळा प्रकरणात लष्कराने अटक केली होती. त्यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयाने कारवाईचे आदेश दिले होते, त्यानंतर त्याचे कोर्टमार्शल सुरू करण्यात आले. त्यांच्यावरील आरोपांच्या चौकशीसाठी लष्कराने एप्रिलमध्ये मेजर जनरलच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती स्थापन केली होती. माजी ‘आयएसआय’ प्रमुख फैज हमीदने अल कादिर ट्रस्ट घोटाळा प्रकरणात ५ अब्ज रुपयांची लाच घेतली होती. इम्रान सरकारच्या काळात मंत्री असलेले आणि त्यांचे मित्र फैजल वाबडा यांनी हे प्रकरण उघड केले होते.