
१९९९मध्ये भारताविरुद्ध कारगिल युद्ध पुकारणारे पाकिस्तानचे (Pakistan) माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ (Pervez Musharraf) यांचे दुबईमध्ये निधन झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दुबईच्या एका रुग्णालयामध्ये त्यांच्यावर गेल्या अनेक दिवसांपासून उपचार सुरु होते. दीर्घ आजारपणामुळे त्यांचे निधन झाल्याची माहिती पाकिस्तानच्या वृत्तवाहिनीकडून देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुशरफ यांच्या कुटुंबीयांनी सांगितले होते की त्यांना अमायलोइडोसिस नावाच्या आजाराने ग्रासले होते. यामुळे त्यांचे सर्व अवयव हळूहळू काम करणे बंद झाले.
१९९८मध्ये त्यांना पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी विश्वास ठेवून लष्कराचे प्रमुख बनवले. त्यानंतर १९९९मध्ये मुशर्रफ यांनी लष्कराच्या बळावर सत्ता काबिज करुन नवाज शरीफ यांना सत्तेबाहेर काढले. त्यानंतर भारताविरुद्ध कारगिलचा कट रचण्यात आला मात्र भारतीय सैन्याने त्यांचा हा कट हणून पाडला होता. वर्ष २००१ ते २००८ यादरम्यान त्यांनी पाकिस्तानचे राष्ट्रपती म्हणून काम पाहिले होते. त्यानंतर त्यांनी काहीकाळ पंतप्रधान पदही भूषवले होते. भारताविरुद्ध त्यांनी अनेक वादग्रस्त विधाने केली होती. मात्र, सत्तेतून पायउतार झाल्यानंतर त्यांच्यावर अनेक प्राणघातक हल्ले झाले. यामुळे ते पाकिस्तान सोडून दुबईला स्थायिक झाले. पाकिस्तानी माध्यमाने दिलेल्या माहितीनुसार, गेले काही दिवस ते दुबईतील एका रुग्णालयात उपचार घेत होते.