
नवी दिल्ली : बांगलादेशच्या पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांनी सोमवारी मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारवर जोरदार टीका केली. लवकरच बांगलादेशात परतून दहशतवाद्यांचे सरकार उलथून लावण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
अवामी लीगचे अध्यक्ष नजरुल इस्लाम यांनी व्हर्च्युअल कॉन्फरन्स आयोजित केली होती. त्यामध्ये सहभागी होताना शेख हसीना यांनी मुहम्मद युनूस सरकारवर जोरदार टीका केली. युनूस यांनी बांगलादेशला दहशतवादाचा अड्डा बनवले आहे. युनूस यांना सरकार चालवण्याचा अनुभव नाही. त्यांनी सर्व तपास समित्या विसर्जित केल्या आणि दहशतवाद्यांना खुले सोडले, असा आरोप त्यांनी यावेळी केला.
मुहम्मद युनूसने आपल्या अंतरिम सरकारमध्ये एका तथाकथित विद्यार्थी नेत्याचा समावेश केला आहे. तो म्हणतो, पोलिसांना मारल्याशिवाय आंदोलन होऊ शकत नाही. ही अराजकता संपवायची आहे. देशाची पुन्हा सेवा करण्यासाठीच अल्लाहने मला हिंसाचारातून वाचवले. मी लवकरच परत येईन आणि हे दहशतवाद्यांचे सरकार पाडेन, तोपर्यंत देशातील सर्व नागरिकांनी शांत आणि एकजूट राहावे. मी परत आल्यावर शहिदांचा बदला घेईन आणि पूर्वीप्रमाणेच न्याय्य सरकार चालवेन, असेही त्या म्हणाल्या.