
मोठ्या आर्थिक खाईत अडकलेल्या श्रीलंकेची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत असून ठिकठिकाणी हिंसाचार बोकाळला आहे. संतप्त नागरिकांनी लोकप्रतिनिधींना लक्ष्य केल्यानंतर वातावरण तापले आहे. श्रीलंकेत ओढवलेल्या या भीषण परिस्थितीमुळे माजी पंतप्रधान महिंदा राजपक्षे जनतेच्या टीकेचे धनी ठरले आहेत. नागरिकांचा उद्रेक झाल्याने महिंदा राजपक्षे यांनी देश सोडला असून त्यांनी भारतात आश्रय घेतला असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र, या चर्चा निव्वळ अफवा असल्याचे भारतीय उच्चायुक्तालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
पंतप्रधानांच्या राजीनाम्यानंतरही श्रीलंकेतील परिस्थिती आटोक्यात आलेली नाही. नागरिक रस्त्यावर उतरुन आंदोलन करत आहेत. दरम्यान, माजी पंतप्रधान महिंदा राजपक्षे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मंगळवारी कडक सुरक्षाव्यवस्थेत कोलंबो सोडल्यानंतर त्रिंकोमालीच्या नाविक तळावर आश्रय घेतला. त्यामुळे सोशल मीडिया व प्रसारमाध्यमांमध्ये काही राजकीय व्यक्ती त्यांच्या कुटुंबासमवेत भारतात पळून गेले आहेत, अशा चर्चा होत्या. मात्र, भारतीय उच्चायुक्तालयाने या अफवा फेटाळल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजपक्षे यांचा दुसरा मुलगा योसिता आणि त्यांचा परिवार देशाच्या बाहेर जाण्यात यशस्वी ठरला आहे.