अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांचे निधन

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांचे रविवारी रात्री उशिरा वयाच्या १००व्या वर्षी निधन झाले.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांचे निधन
Published on

वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांचे रविवारी रात्री उशिरा वयाच्या १००व्या वर्षी निधन झाले. जॉर्जिया येथील त्यांच्या राहत्या घरी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. १९७७ ते १९८१ या कालावधीत त्यांनी अमेरिकेचे ३९वे राष्ट्राध्यक्ष म्हणून सूत्रे सांभाळली होती. अमेरिकेच्या इतिहासात ते सर्वात जास्त काळ जगणारे अध्यक्ष होते.

जिमी कार्टर हे काही काळापासून मेलेनोमाने त्रस्त होते. हा एकप्रकारचा त्वचेचा कर्करोग आहे. तो त्यांच्या यकृत आणि मेंदूमध्ये पसरला होता. अध्यक्षपद सोडल्यानंतर त्यांनी ‘कार्टर सेंटर’ या त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून अनेक वर्षे मानवतावादी कार्य केले. त्यांना २००२ मध्ये त्यांच्या मानवतावादी कार्यासाठी शांततेचा नोबेल पुरस्कारदेखील मिळाला होता. इस्रायल आणि इजिप्तमधील शांततेचे श्रेय त्यांना दिले जाते. जिमी कार्टर यांनी १९७६ च्या अमेरिकेतील निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष, रिपब्लिकन उमेदवार गेराल्ड फोर्ड यांना पराभूत केल्यानंतर व्हाईट हाऊसमध्ये प्रवेश केला. १९८०च्या निवडणुकीत अभिनेता-राजकारणी बनलेल्या रोनाल्ड रेगन यांनी त्यांचा पराभव केला होता, त्यांनी यापूर्वी कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर म्हणून काम केले होते.

कार्टर हे अलिकडच्या काळात यकृत आणि मेंदूसंबंधी आजाराने ग्रस्त होते. १९ नोव्हेंबर २०२३ रोजी वयाच्या ९६व्या वर्षी त्यांच्या पत्नी रोझलिन कार्टर यांचे निधन झाल्यानंतर त्यांनी व्हीलचेअरवर बसून अंत्यसंस्काराला हजेरी लावली होती. तेव्हाच ते खूपच अशक्त दिसत होते. जिमी कार्टर यांनी १ ऑक्टोबर २०२४ मध्ये जॉर्जियामधील त्यांच्या घराच्या मागील अंगणात कुटुंब आणि मित्रांच्या उपस्थितीत १००वा वाढदिवस साजरा केला. राजकारणात येण्यापूर्वी जिमी कार्टर हे शेंगदाणा शेतकरी होते. ते अमेरिकन नौदलात लेफ्टनंट म्हणूनही कार्यरत होते. १९७७ ते १९८१ पर्यंत त्यांनी जॉर्जियाचे राज्यपाल आणि युनायटेड स्टेट्सचे अध्यक्ष म्हणून एक टर्म काम केले.

जगाने एक असाधारण नेता गमावला - बायडेन

“आज अमेरिका आणि जगाने एक असाधारण नेता, राजकारणी आणि मानवतावादी गमावला आहे. सहा दशकांपासून जिमी कार्टरला आमचे जवळचे मित्र म्हणण्याचा मान आम्हाला मिळाला होता, परंतु जिमी कार्टरची विलक्षण गोष्ट अशी आहे की, अमेरिकेत आणि जगभरातील लाखो लोक जे त्यांना कधीच भेटले नाहीत, त्यांनी त्यांना जवळचा मित्र मानले होते,” अशा शब्दांत अमेरिकेचे माजी अध्यक्ष जो बायडेन यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

logo
marathi.freepressjournal.in