फ्रान्समध्येही हिंसाचाराचा उद्रेक! 'ब्लॉक एव्हरीथिंग' आंदोलनात जाळपोळीचे प्रकार; ३०० हून अधिक जणांना अटक; ८०,००० पोलीस तैनात

नेपाळमधील हिंसक आंदोलनानंतर आता फ्रान्समधील जनता राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याविरोधात रस्त्यावर उतरली आहे. मॅक्रॉन सरकारने लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी काहीही केले नाही आणि त्यांचे आर्थिक व्यवस्थापन खूपच खराब झाले आहे, असे जनतेचे म्हणणे आहे. त्याविरोधात बुधवारी सकाळी निदर्शने करण्यात आली तेव्हा पॅरिस आणि इतर मोठ्या शहरात पोलीस अन् आंदोलनकर्ते यांच्यात जोरदार धुमश्चक्री झाली.
फ्रान्समध्येही हिंसाचाराचा उद्रेक! 'ब्लॉक एव्हरीथिंग' आंदोलनात जाळपोळीचे प्रकार; ३०० हून अधिक जणांना अटक; ८०,००० पोलीस तैनात
Published on

पॅरिस : नेपाळमधील हिंसक आंदोलनानंतर आता फ्रान्समधील जनता राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याविरोधात रस्त्यावर उतरली आहे. मॅक्रॉन सरकारने लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी काहीही केले नाही आणि त्यांचे आर्थिक व्यवस्थापन खूपच खराब झाले आहे, असे जनतेचे म्हणणे आहे. त्याविरोधात बुधवारी सकाळी निदर्शने करण्यात आली तेव्हा पॅरिस आणि इतर मोठ्या शहरात पोलीस अन् आंदोलनकर्ते यांच्यात जोरदार धुमश्चक्री झाली. आंदोलकांना रोखण्यासाठी ८० हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलाय. ‘ब्लॉक एव्हरिथिंग’ नावाने सुरू झालेले आंदोलन संपूर्ण देशात पसरले असून आतापर्यंत २०० ते ३०० जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांनी आंदोलनकर्त्यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेत पॅरिसमध्ये आतापर्यंत २०० ते ३०० जणांना ताब्यात घेतले त्यामुळे आंदोलक आणखी चिडले आहेत. बुधवारी आंदोलकांनी देशातील विविध महामार्ग रोखले. अनेक ठिकाणी जाळपोळ करण्यात आली, तसेच जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. आंदोलकांनी काही बसेसनाही आग लावली असल्याचे समोर आले आहे. सोशल मीडियावर ब्लॉक एव्हरीथिंग या आवाहनानंतर ही निदर्शने सुरू झाली आणि आता लोक संघटित पद्धतीने आंदोलन करण्यासाठी बाहेर पडले आहेत. हजारो पोलीस आंदोलनकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु सध्या त्यांच्यावर नियंत्रण मिळवणे कठीण झाले आहे. पॅरिससह अनेक मोठ्या शहरांमध्ये परिस्थिती बिकट झाली आहे. संसदेत अलीकडेच पंतप्रधान फ्रँकोइस बायरो यांच्याविरोधात विश्वासदर्शक ठराव आणला होता, त्यामध्ये बहुमत सिद्ध करण्यात त्यांना अपयश आले आहे. त्यानंतर आता तीव्र आंदोलन सुरु झाले आहे.

ब्लॉक एव्हरीथिंग

ब्लॉक एव्हरीथिंग हे फ्रान्समधील आंदोलनाचे नाव आहे. यामागचा उद्देश असा आहे की, देशाची सध्याची राजकीय व्यवस्था आता जनतेसाठी उपयुक्त नाही. ही व्यवस्था उजव्या विचारसरणीच्या लोकांनी सुरू केली होती, मात्र आता ती डाव्या आणि अति-डाव्या विचारसरणीच्या लोकांनी ताब्यात घेतली आहे. त्यामुळे लोक रस्त्यावर उतरले आहेत. आंदोलकांचे म्हणणे आहे की, जर व्यवस्था काम करत नसेल तर देशातील यंत्रणा बंद करा. त्यामुळे आंदोलकांनी महामार्ग, शहरे आणि वाहतूक व्यवस्था बंद करण्याची घोषणा केली. त्यामुळे याला ब्लॉक एव्हरीथिंग असे म्हटले जात आहे.

सुपरमार्केट, पेट्रोल पंपही लक्ष्य

आंदोलक फक्त रेल्वे आणि रस्ते वाहतूक रोखत नसून तर तेल डेपो, सुपरमार्केट आणि पेट्रोल पंपांनाही लक्ष्य करत आहेत. सोशल मीडियावर काही गटांनी तर लोकांना दुकान लुटण्याचे आवाहन केलेय. फ्रान्समधील हे आंदोलन ‘यलो वेस्ट्स’ या आंदोलनाची आठवण करून देतेय. यलो वेस्ट्सने काही वर्षांपूर्वी मॅक्रॉन यांना धोरणांमध्ये बदल करण्यास भाग पाडले होते. चेहऱ्यावर मास्क लावून शेकडो लोक रस्त्यावर उतरले आहेत. आंदोलनकर्त्यांनी फ्रान्समधील रस्ते अडविले असून ठिकठिकाणी कचऱ्याचे डब्बे अन् बॅरिगेट्स लावून वाहतूक अडवली आहे. पॅरिसशिवाय बोरदॉ आणि मार्सिले या शहरातही आंदोलक आक्रमक झालेत. पोलिसांवर बाटल्या अन् फ्लेयर्स फेकल्या जात आहेत. त्याशिवाय रेल्वे हब गारे दू नॉर स्टेनशवरही आंदोलन केले जातेय. पुढील काही दिवसांत हा रोष आणि संताप आणखी वाढू शकतो. रस्त्यावर आणखी जमाव उतरू शकतो, असा अंदाज स्थानिक पोलिसांनी वर्तवला आहे.

logo
marathi.freepressjournal.in