स्टॉकहोम : बेल्जियमचे शास्त्रज्ञ फ्रान्सिस हॅल्झेन यांना २०२६ सालचा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. आईसक्यूब न्यूट्रिनो वेधशाळेतील महत्त्वपूर्ण योगदानासाठी आणि अंतराळातून पृथ्वीपर्यंत पोहोचणाऱ्या अत्यंत ऊर्जावान न्यूट्रिनो कणांचा शोध घेतल्याबद्दल ‘रॉयल स्वीडिश अकादमी ऑफ सायन्सेस’ने हॅल्झेन यांना हा सन्मान जाहीर केला आहे.
नोबेल पुरस्कार विजेत्यांचा डिसेंबरमध्ये स्वीडनची राजधानी स्टॉकहोम येथे गौरव करण्यात येईल. त्यांना पदक, प्रमाणपत्र आणि पुरस्काराची रक्कम दिली जाईल. २०२६ मध्ये नोबेल पुरस्काराची रक्कम सुमारे ११.५ कोटी रुपये आहे.
ब्रह्मांडातील रहस्यवेध घेणे झाले शक्य
विशेष म्हणजे ८२ वर्षीय शास्त्रज्ञ फ्रान्सिस हॅल्झेन हे सध्या अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ विस्कॉन्सिन-मॅडिसनशी जोडलेले आहेत. त्यांच्या या संशोधनामुळे खगोलशास्त्रज्ञांना ब्रह्मांडात घडणाऱ्या अत्यंत ऊर्जावान आणि रहस्यमय घटनांच्या उगमाचा वेध घेणे शक्य झाले आहे. ज्यामुळे खगोल भौतिकशास्त्रात एक नवे दालन उघडले गेले आहे.
‘आइसक्यूब न्यूट्रिनो वेधशाळे’ची निर्मिती
हॅल्झेन यांनी १९८८ मध्येच न्यूट्रिनो शोधण्यासाठी दक्षिण ध्रुवाच्या खाली असलेल्या बर्फाचा वापर करण्याची कल्पना मांडली होती. तत्त्वतः त्यांची कल्पना सोपी होती. मात्र तिची अंमलबजावणी मोठ्या प्रमाणावर करावी लागणार होती. जेव्हा एखादा न्यूट्रिनो क्वचितच अणूच्या केंद्रकावर आदळतो, तेव्हा त्या धडकेत प्रकाशाची एक अतिशय लहान चमक निर्माण होते. अंटार्क्टिकाच्या बर्फात खोलवर बसवलेले सेन्सर ही प्रकाशाची चमक शोधू शकतात. त्याच्या आधारे न्यूट्रिनोविषयीची माहिती मिळवता येते. याच कल्पनेतून पुढे ‘आइसक्यूब न्यूट्रिनो वेधशाळे’ची निर्मिती झाली. ही वेधशाळा अंटार्क्टिकामधील सुमारे एक घन किलोमीटर बर्फाच्या भागात पसरलेली आहे आणि त्यामध्ये हजारो प्रकाश सेन्सर बसवण्यात आले आहेत.
उच्च-ऊर्जा न्यूट्रिनोंचा शोध सुरू
आइसक्यूबचे काम २०११ मध्ये पूर्ण झाल्यानंतर संशोधकांनी उच्च-ऊर्जा न्यूट्रिनोंचा शोध घेण्यास सुरुवात केली. पुढे त्यांनी आपल्या सौरमालेच्या खूप पलीकडून येणारे न्यूट्रिनोही शोधले. त्यामुळे विश्वातील सर्वाधिक ऊर्जावान कणांच्या काही स्रोतांचा माग काढण्यास वैज्ञानिकांना सुरुवात करता आली.
‘न्यूट्रिनो’ हे अतिशय लहान कण असून ते सूर्य, तारे आणि अवकाशातील अत्यंत शक्तिशाली घटनांमधून बाहेर पडतात. दर सेकंदाला अब्जावधी न्यूट्रिनो आपल्या शरीरातून आणि पृथ्वीच्या आरपार जातात, पण आपल्याला त्यांची जाणीवही होत नाही. या कणांचे वैशिष्ट्य असे आहे की, ते अवकाशातून निघून जवळजवळ सरळ दिशेने पृथ्वीपर्यंत पोहोचतात आणि या मार्गात त्यांच्यात फारच कमी बदल होतात. ‘न्यूट्रिनो’ म्हणजेच भूतकणांचा शोध घेणे अत्यंत कठीण होते. मात्र याच कारणामुळे ते अत्यंत उपयुक्तही ठरतात. इतर वैश्विक कणांच्या तुलनेत उच्च-ऊर्जा न्यूट्रिनो प्रचंड अंतराचा प्रवास करू शकतात.