फ्रान्सला मिळाले सर्वात तरुण 'गे' पंतप्रधान; जाणून घ्या गॅब्रियल अटल यांच्याविषयी

याआधी फ्रान्समध्ये लॉरेंट फॅबियस वयाच्या 37 व्या वर्षी पंतप्रधान झाले होते. 1984 मध्ये फ्रँकोइस मिटरँड यांनी त्यांची पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली होती.
फ्रान्सला मिळाले सर्वात तरुण 'गे' पंतप्रधान; जाणून घ्या गॅब्रियल अटल यांच्याविषयी
Published on

फ्रान्सला सर्वात तरुण पंतप्रधान मिळाले आहेत. राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी मंगळवारी 34 वर्षीय गॅब्रियल अटल यांची फ्रान्सच्या पंतप्रधानपदी नियुक्ती केली आहे. अटल यांनी यापूर्वी शिक्षणमंत्री पदाची धुरा सांभाळली आहे. आता ते युद्धोत्तर फ्रान्सचे सर्वात तरुण पंतप्रधान ठरले आहेत. फ्रान्समध्ये इमिग्रेशन कायद्यावरून राजकीय तणाव सुरु असल्याने 62 वर्षीय एलिझाबेथ बॉर्न यांनी दोन दिवसांपूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. यानंतर अटल यांची पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली. विशेष म्हणजे अटल यांनी स्वत:ला जाहीरपणे 'समलिंगी' (गे) घोषित केले आहे. याआधी फ्रान्समध्ये लॉरेंट फॅबियस वयाच्या 37 व्या वर्षी पंतप्रधान झाले होते. 1984 मध्ये फ्रँकोइस मिटरँड यांनी त्यांची पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली होती.

राजकीय सल्लागारासोबत होते संबंध-

फ्रान्सचे पहिले समलिंगी पंतप्रधान ठरलेले अटल हे 2018 साली प्रसिद्धीच्या झोतात आले. ते मॅक्रॉन सरकारमध्ये मंत्री असताना त्यांचे माजी राजकीय सल्लागार स्टेफेन सेजॉर्न यांच्याशी समलैंगिक संबंध होते. त्यांच्या माजी वर्गमित्राने ही माहिती सार्वजनिक केली होती.

यामुळे मिळाली नव्या चेहऱ्याला संधी-

फ्रान्स मीडियाच्या मते, मॅक्रोन यांची यावेळची निवडणूक जिंकणे कठीण आहे. कट्टर उजव्या विचारसरणीचे नेते मरिन ले पेन यांचा पक्ष आठ ते दहा टक्के अधिक मतदान मिळवण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे मॅक्रोन मोठे निर्णय घेताना दिसत आहेत. त्यांना निवडणुकीपूर्वी जनमानसात नवा विश्वास निर्माण करायचा आहे. यामुळे एलिझाबेथ यांना हटवून नव्या आणि तरुण चेहऱ्याला पंतप्रधानपदी संधी देण्यात आली आहे.

फ्रान्समधील सर्वात कमी वयाचे मंत्री देखील ठरले-

अटल हे आतापर्यंत देशाचे शिक्षण मंत्री म्हणून कार्यरत होते. त्यांना राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांचे निकटवर्तीय मानले जाते. ते फ्रान्सचे आतापर्यंतचे सर्वात तरुण शिक्षण मंत्री देखील होते. ते समाजवादी म्हणून देखील ओळखले जातात. सरकारी प्रवक्ता म्हणून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. यानंतर त्यांचा आलेख हा चढता राहिलेला आहे. पाच वर्षांपूर्वी ते सरकारमध्ये पहिल्यांदा मंत्री झाल्यानंतर फ्रान्स प्रजासत्ताकच्या इतिहासातील सर्वात तरुण मंत्री बनले होते.

logo
marathi.freepressjournal.in