देर-अल-बल्ला (गाझा पट्टी) : इस्रायल आणि 'हमास'मध्ये दोन वर्षे गाझात सुरू असलेले युद्ध अखेर समाप्त झाले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या मध्यस्थीनंतर इस्रायल-हमासमध्ये युद्धविराम झाला असून ‘हमास’ने इस्रायलच्या २० अपहृत नागरिकांची दोन वर्षांनी सुटका केली, तर इस्रायलने २५० पॅलेस्टिनी कैद्यांची मुक्तता केली आहे. गाझा संघर्ष संपु्ष्टात आल्याने जगाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
‘हमास’ने २० इस्रायली ओलिसांची सुटका केली आहे. पहिल्या टप्प्यात ७ व नंतर १३ जणांना सोडण्यात आले. ‘हमास’ने रेड क्रॉसच्या मदतीने ओलिसांना इस्रायली सैन्याच्या हवाली केले. आता ‘हमास’कडे कोणताही जिवंत इस्रायली ओलीस नाही. यानंतर इस्रायलने २५० पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका केली.
हा सुटकेचा कार्यक्रम अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इस्रायल भेटीच्या वेळी झाला. ट्रम्प यांच्या मध्यस्थीने इस्रायल आणि ‘हमास’ यांच्यात झालेल्या या युद्धविराम आणि ओलिसांच्या सुटकेचा कराराचा त्यांनी ‘मध्यपूर्वेत टिकाऊ शांततेचा मार्ग मोकळा करणारा करार’ असा गौरव केला.
करारानुसार, इस्रायल १९०० हून अधिक पॅलेस्टिनी कैद्यांची मुक्तता करणार असून दुष्काळग्रस्त गाझात अन्न आणि मदतसामग्रीचा पुरवठा वाढविण्याची परवानगी दिली आहे.
ट्रम्प सोमवारी इजिप्तमध्ये अन्य जागतिक नेत्यांशी अमेरिकेच्या प्रस्तावित करार आणि युद्धोत्तर योजनांवर चर्चा करणार आहेत.
गाझातून ६० मृतदेह बाहेर काढले
गाझाच्या आरोग्य मंत्रालयानुसार, गेल्या २४ तासांत उद्ध्वस्त इमारतींच्या अवशेषांमधून ६० पॅलेस्टिनी नागरिकांचे मृतदेह बाहेर काढले गेले. युद्धविरामानंतर इस्रायली सैन्याने काही भागातून माघार घेतल्यानंतर ४ दिवसांत आतापर्यंत २०० मृतदेह सापडले आहेत. अनेक मृतदेह अजूनही मलब्याखाली अडकले आहेत, विशेषतः ज्या भागात बचाव पथकांना प्रवेश मिळत नाही.
इस्रायलच्या हल्ल्यात गाझात ६७,८०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये सुमारे निम्मी महिला आणि मुले आहेत.
संयुक्त राष्ट्र प्रमुखांकडून आनंद व्यक्त
संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी इस्रायली अपहृतांना स्वातंत्र्य मिळाल्याबद्दल ‘खूपच दिलासा वाटतो’ असे सांगितले. गुटेरेस यांनी मृत बंदिवानांचे अवशेष परत करण्याचे आवाहन केले आणि गाझातील संकट संपवण्यासाठी युद्धविरामाचे पालन करण्यास सर्व पक्षांना प्रोत्साहित केले.
एर्दोगान गाझा शिखर परिषदेत सहभागी होणार
तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान, ज्यांच्या सरकारने या युद्धविराम करारात महत्त्वाची भूमिका बजावली. तेही इजिप्तमधील शिखर परिषदेत सहभागी होणार असून अनेक जागतिक नेत्यांशी चर्चा करणार आहेत. ही परिषद अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सीसी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
इजिप्तचे परराष्ट्र मंत्री बद्र अब्देलअटी यांनी म्हटले की, या कराराच्या पहिल्या टप्प्याची पूर्ण अंमलबजावणी करणे आणि पुढील अधिक गुंतागुंतीच्या टप्प्यासाठी वाट मोकळी करणे महत्त्वाचे आहे आणि यासाठी ट्रम्प यांचा सातत्यपूर्ण सहभाग आवश्यक आहे.
‘हमास’ने ट्रम्प यांच्या वक्तव्याचे केले स्वागत
हमासचे प्रवक्ते हाझेम कासेम यांनी ट्रम्प यांच्या ‘गाझा युद्ध संपले’ या वक्तव्याचे स्वागत केले आणि आंतरराष्ट्रीय समुदायाला इस्रायलने पुन्हा संघर्ष सुरू करू नये याची खात्री करण्याचे आवाहन केले.
पश्चिम आशियासाठी ऐतिहासिक सकाळ
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलच्या ‘नेसेट’मध्ये (संसद) भाषण केले. ते म्हणाले की, गाझा अपहृतांची सुटका केल्याप्रकरणी आपण अरब देश व मुस्लिम नेत्यांचे अभिनंदन करतो. या नेत्यांनी ‘हमास’वर दबाव आणून अपहृतांची सुटका करण्यास मदत केली. मी त्यांचे आभार मानतो. हा इस्रायल व जगासाठी मोठा विजय आहे. सर्व देश शांततेसाठी काम करत आहेत. ही पश्चिम आशियासाठी ऐतिहासिक सकाळ आहे, असे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, गेली दोन वर्षे कैदेत राहिल्यानंतर २० शूर अपहृत आपल्या कुटुंबाकडे परतले आहेत. ही बाब खूपच आनंददायी आहे. सर्व शक्तिमान ईश्वराला धन्यवाद देण्याचा हा दिवस आहे, असे त्यांनी सांगितले.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी आपल्या भाषणाची सुरुवात हिब्रू भाषेत केली आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना धन्यवाद दिले. ते म्हणाले की, ट्रम्प यांनी सातत्याने इस्रायलला मदत केली आहे. त्यामुळेच ट्रम्प हे इस्रायलचे सर्वात चांगले मित्र आहेत. त्यांचे नाव देशाच्या इतिहासात कायम राहील. संपूर्ण देशातर्फे व माझ्यातर्फे ट्रम्प यांना मी धन्यवाद देतो. तसेच ट्रम्प यांना इस्रायलचा सर्वोच्च सन्मान देण्याची घोषणा त्यांनी केली. या युद्धाची मोठी किंमत आम्ही चुकवली आहे. मात्र, आमचे शत्रू समजले आहेत की, इस्रायल किती शक्तिशाली आहे.
नेपाळच्या बिपीनच्या मृत्यूची शंका
नेपाळचे बिपीन जोशी या २२ वर्षीय विद्यार्थ्याचे तसेच इस्रायली सैनिक तमीर निमरोदी यांचे इस्रायलमधून अपहरण करण्यात आले होते. इस्रायलने सोमवारी जाहीर केले की, सर्व जिवंत अपहृतांची सुटका झालेली आहे. त्यामुळे बिपीन व तमीर यांना मृत ठरवण्यात आले आहे. दरम्यान, ट्रम्प आणि नेत्यानाहू यांनी इस्रायली संसदेत ‘हमास’च्या तावडीतून सुटका झालेल्या अपहृतांची व त्यांच्या कुटुंबाची भेट घेतली.
जिवंत सोडलेल्या इस्रायली अपहृतांची नावे
एल्काना बोहबोट, मतान अंगरेस्ट, अविनातन ओर योसेफ-हैम ओहाना, अलोन ओहेल, एव्याटर दाऊद गाय गिल्बोआ-दलाल, रोम ब्रास्लावस्की, गली बर्मन जिव बर्मन, ईटन मोर, सेगेव कल्फॉन, मैक्सिम हर्किन एतान हॉर्न, बार कुपरशेटिन, ओमरी मिरान, डेविड क्यूनियो, एरियल क्यूनियो, निम्रोद कोहेन, मतान जांगौकर.
ट्रम्प यांच्या प्रयत्नांचे मोदींकडून कौतुक
‘हमास’द्वारे इस्रायली अपहृतांच्या सुटकेचे प्रयत्न केल्याप्रकरणी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले. तसेच इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांचेही अभिनंदन केले. ‘ट्रम्प यांचे शांतीसाठी प्रामाणिक प्रयत्न व इस्रायली पंतप्रधानांच्या मजबूत इच्छाशक्तीला हे ओलिसांचे स्वातंत्र्य समर्पित आहे’, असे मोदी म्हणाले.
इराणचा शिखर परिषदेत सहभागी होण्यास नकार
इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, अमेरिकेच्या ‘एकतर्फी धोरणा’मुळे आणि राष्ट्रीय हित लक्षात घेऊन त्यांनी इजिप्तमधील ‘शर्म अल-शेख’ येथे होणाऱ्या शिखर परिषदेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे.
इस्रायलने मुक्त केलेले पॅलेस्टिनी गाझामध्ये परतले
ओफर तुरुंगातून सुटलेल्या पॅलेस्टिनी कैद्यांना घेऊन बस रामल्लाहला पोहोचल्या, तर त्यापैकी एक बस गाझा पट्टीत पोहोचली असल्याचे ‘हमास’च्या कैदी विभागाने सांगितले.