व्हर्च्युअल गेममध्ये मुलीवर सामूहिक बलात्कार, जगातील पहिलाच गुन्हा दाखल

१६ वर्षीय पीडितेला मानसिक धक्का, गुन्हागाराला शोधण्याचे पोलिसांसमोर आव्हान
व्हर्च्युअल गेममध्ये मुलीवर सामूहिक बलात्कार, 
जगातील पहिलाच गुन्हा दाखल

लंडन : मेटाव्हर्समध्ये व्हर्च्युअल रिॲलिटी गेममध्ये एका १६ वर्षीय मुलीच्या अवतारावर पाच अज्ञातांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. ब्रिटनमध्ये ही घटना घडली असून अशा प्रकारचा गुन्हा जगात पहिल्यांदाच घडला आहे. ब्रिटिश पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकारामुळे मुलीला शारीरिक इजा झाली नाही, पण तिला खऱ्या बलात्कार पीडितेइतकाच मानसिक धक्का बसला आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत.

ब्रिटनचे गृहमंत्री जेम्स क्लेव्हर्ली यांनी या प्रकरणाबाबत म्हटले आहे की, ‘या प्रकरणाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. परंतु, एक गोष्ट चिंतेची आहे की, आजची तरुणाई व्हर्च्युअल प्रकारांमध्ये मोठ्या प्रमाणात बुडाली आहे. त्यामुळेच अशा गोष्टींचा त्यांच्या मनावर खोलवर परिणाम होतो. जे लोक व्हर्च्युअल रिॲलिटीमध्ये मुलीशी अशा प्रकारचे वर्तन करू शकतात, ते वास्तवात जास्त धोकादायक असू शकतात.’ डेली मेलच्या वृत्तानुसार, ब्रिटनमध्ये सध्या व्हर्च्युअल बलात्काराबाबत कोणताही कायदा नसल्याने या प्रकरणाचा तपास करणे खूप कठीण जाणार आहे. फेसबुकची मूळ कंपनी मेटाने २०२१ मध्ये होरायझन वर्ल्ड्स नावाची व्हर्च्युअल रिॲलिटी स्पेस तयार केली. यावर वापरकर्त्यांचा अवतार तयार केला जातो. गेम खेळण्यासोबतच लोक इतरांच्या अवतारांनाही भेटू शकतात. होरायझन वर्ल्ड्समध्ये व्हर्च्युअल स्तरावर लैंगिक गुन्ह्यांशी संबंधित अनेक प्रकरणे आतापर्यंत समोर आली आहेत. याप्रकरणी मेटा कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, आमच्या प्लॅटफॉर्मवर अशा गुन्ह्यांना जागा नाही. हे टाळण्यासाठी आम्ही आमच्या वापरकर्त्यांसाठी काही सीमा आखल्या आहेत. त्यामुळे अज्ञात लोकांना वापरकर्त्याच्या अवतारापासून दूर ठेवता येऊ शकते.

मेटाव्हर्स हे एक आभासी जग आहे, जिथे कोणीही आभासी (व्हर्च्युअली) पद्धतीने प्रवेश करू शकतो. परंतु, त्या ठिकाणी शारीरिकरीत्या उपस्थित असल्याची भावना असेल. म्हणजे एक आभासी जग आहे जिथे तुमची वेगळी ओळख आहे. येथे तुम्ही स्नॅप चॅट आणि बिटमोजीप्रमाणेच तुमचा डिजिटल अवतार तयार करू शकता. हा डिजिटल अवतार तयार करून, तुम्ही त्याच अवतारात फिरू शकता, खरेदी करू शकता, इतर लोकांना भेटू शकता, मालमत्ता खरेदी करू शकता आणि वास्तव जगात जे काही पाहता, ते करू शकता. येथे चलन म्हणून क्रिप्टोकरन्सी वापरली जाते.

मेटाव्हर्समध्ये गुन्हेगारांना संधी

नॅशनल पोलिस चीफ कौन्सिलचे चाइल्ड प्रोटेक्शन अँड ॲब्यूज इन्व्हेस्टिगेशनचे अध्यक्ष इयान क्रिचले याबाबत म्हणाले, मेटाव्हर्समध्ये लैंगिक गुन्हेगारांना गुन्हे करण्याची संधी मिळते. त्यामुळे अशा प्रकरणांविरोधात आम्ही कारवाई करत आहोत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरक्षितपणे होत असल्याची खात्री करणे आवश्यक आहे. गेल्या काही वर्षांत गुन्हेगारांचे प्रकार वाढले आहेत. वास्तविक जगातील गुन्हे डिजिटल रुपातही होत असल्याने पोलिसांसमोरील आव्हाने वाढली आहेत.’

आभासी बलात्काराच्या घटना वारंवार

आभासी बलात्काराची पहिली घटना १९९३ साली समोर आली होती. २०२२ मध्ये फेसबुकच्या मेटाव्हर्समध्ये प्रवेश केल्याच्या तासाभरात एका संशोधकावर तिथे उपस्थित असलेल्या दुसऱ्या अवताराने बलात्कार केला होता. संशोधकाने सांगितले होते की, बलात्कार हा आभासी जगात घडला होता, तरीही तिला तिच्यावर बलात्कार झाल्यासारखे वाटत होते. याशिवाय, ४५ वर्षीय ब्रिटिश मानसशास्त्रज्ञ नीना जेन पटेल यांनी फेब्रुवारी २०२२ मध्ये सोशल मीडिया पोस्टमध्ये सांगितले होते की, फेसबुक मेटाव्हर्समध्ये तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला होता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in