आगामी काळात होतील उष्णतेचे नवे विक्रम; आरोग्यावरही संभवतात गंभीर परिणाम, १.५ अंश सेल्सिअसची मर्यादाही ओलांडली जाईल

आगामी काही वर्षांमध्ये पृथ्वीवर विक्रमी उष्णता जाणवणार असून ही उष्णता आणखी घातक, जळजळीत आणि अस्वस्थ बनवणारी ठरणार आहे, असा इशारा जगातील दोन आघाडीच्या हवामान संस्था – जागतिक हवामान संस्था आणि ब्रिटनच्या हवामान विभागाने दिला आहे.
आगामी काळात होतील उष्णतेचे नवे विक्रम; आरोग्यावरही संभवतात गंभीर परिणाम, १.५ अंश सेल्सिअसची मर्यादाही ओलांडली जाईल
(संग्रहित छायाचित्र)
Published on

वॉशिंग्टन: आगामी काही वर्षांमध्ये पृथ्वीवर विक्रमी उष्णता जाणवणार असून ही उष्णता आणखी घातक, जळजळीत आणि अस्वस्थ बनवणारी ठरणार आहे, असा इशारा जगातील दोन आघाडीच्या हवामान संस्था – जागतिक हवामान संस्था आणि ब्रिटनच्या हवामान विभागाने दिला आहे.

या दोन संस्थांनी दिलेल्या पाच वर्षांच्या अंदाजानुसार, पुढील पाच वर्षांत किमान एकदा तरी पृथ्वीवरील सरासरी तापमानाचे विक्रमी उच्चांक मोडले जातील, अशी ८० टक्के शक्यता आहे. तसेच १० वर्षांपूर्वी ठरवलेली आंतरराष्ट्रीय तापमान मर्यादा- १.५ अंश सेल्सिअसऋपुन्हा ओलांडली जाईल, हे जवळपास निश्चित मानले जात आहे.

कॉर्नेल विद्यापीठाच्या हवामान वैज्ञानिक नताली माहोवाल्ड म्हणाल्या, "जागतिक तापमानात वाढ ही फक्त आकडेवारीसारखी वाटत असली तरी तिचे परिणाम अत्यंत प्रत्यक्ष आणि गंभीर असतात – तीव्र वादळं, प्रचंड पावसाळे, दुष्काळ." त्यांनी ही भविष्यवाणी तयार केली नव्हती, पण अंदाजाला पूर्णपणे अर्थ आहे, असं त्यांनी सांगितलं.

उष्णतेच्या लाटा, दुष्काळ, पूर, वणवे...

जर्मनीतील पॉट्सडॅम हवामान परिणाम संशोधन संस्थेचे संचालक जोहान रॉकस्ट्रॉम यांनी एका ईमेलमध्ये सांगितलं की, मानव निर्मित हवामान बदलामुळे दर दहाव्या अंश सेल्सिअस वाढीसोबत उष्णतेच्या लाटांपासून दुष्काळ, पूर, जंगलातील वणवे आणि तीव्र वादळे अधिक वेळा व अधिक तीव्र स्वरूपात दिसतील.

गंभीर परिस्थिती

प्रथमच, दशक संपण्याआधी पृथ्वीचं वार्षिक तापमान पॅरिस करारातील १.५ अंश सेल्सिअस मर्यादा ओलांडून थेट २ अंश सेल्सिअस (३.६°F) वर पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे – ही अत्यंत गंभीर बाब आहे, असं या दोन्ही संस्थांनी नमूद केलं आहे. पुढील पाच वर्षांतील किमान एक वर्ष १.५ अंशाच्या पुढे जाईल, अशी ८६% शक्यता आहे, आणि ही पाच वर्षं एकत्रितपणे सरासरी १.५ अंशाहून अधिक तापमानाची असतील, अशी ७०% शक्यता आहे. हा अंदाज १० जागतिक हवामान केंद्रांद्वारे चालवलेल्या २०० हून अधिक संगणकीय सिम्युलेशन्सवर आधारित आहे.

logo
marathi.freepressjournal.in