
आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या गो फर्स्टने पुन्हा एकदा ३० मे पर्यंतची सर्व उड्डाणे रद्द केली आहेत. तसेच, कंपनीने प्रवाशांना त्यांचा परतावा लवकरात लवकर परत करण्याचे आश्वासन दिले आहे. गो फर्स्टने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ही माहिती दिली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार काही ऑपरेशनल कारणांमुळे उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल कंपनीने माफीही मागितली आहे.
डीजीसीएने गो फर्स्ट एअरलाइन्सला त्यांच्या सर्व विमानांचा तपशील मागवला आहे. गो फर्स्टनेही त्यांच्या कर्मचाऱ्यांची माहिती लवकरात लवकर देण्याच्या सूचना दिल्या आहेत. दुसर्याच दिवशी, गो फर्स्टने ३० मे पर्यंत सर्व उड्डाणे रद्द करण्याची घोषणा केली. सुरुवातीला फक्त दोन दिवस उड्डाणे रद्द करण्यात आली होती, परंतु आता उड्डाणे ३० मे पर्यंत रद्द करण्यात आली आहेत, असे कंपनीने सांगितले.
'सेवा लवकरच सुरू होईल'
गो फर्स्टने त्यांची उड्डाणे रद्द केल्यानंतर प्रवाशांच्या गैरसोयीबद्दल माफीही मागितली आहे. लवकरच ही सेवा पुन्हा सुरू करण्यात येईल, असेही कंपनीकडून सांगण्यात येत आहे. गो फर्स्टला डीजीसीएने त्याचे व्यवस्थापन तसेच विमानांमध्ये आणखी सुधारणा करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे गो फर्स्टकडून जी माहिती डीजीसीएला सादर केली जाईल, त्यानंतर डीजीसीएकडून कंपनीबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे बोलले जात आहे. याआधीही GoFirst ने ऑपरेशनल कारणांमुळे 9 मे पर्यंत सर्व उड्डाणे रद्द केली होती. गो फर्स्ट सध्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे.