भारताशी चांगले संबंध अशक्य!

पाकचे नवनिर्वाचित पंतप्रधान शाहबाज यांचा ‘काश्मीरराग’
भारताशी चांगले संबंध अशक्य!

आम्हाला भारतासोबत चांगले संबंध हवे आहेत; पण काश्मीर प्रश्न सुटेपर्यंत ते शक्य नाही. काश्मीरबाबत आमची भूमिका बदलू शकत नाही. त्यांना यापुढेही सर्व बाबतीत आम्ही पाठिंबा देत राहू, असा इशारा देत पाकिस्तानचे नवनिर्वाचित पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारताविषयीचे आडमुठेपणाचे धोरण जाहीर केले. इम्रान खान पायउतार झाल्यानंतर माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे धाकटे बंधू आणि पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाज पक्षाचे नेते शाहबाज शरीफ यांची पाकिस्तानचे २३वे पंतप्रधान निवड झाली. त्यामुळे पाकिस्तानात पुन्हा एकदा शरीफराज आले आहे.

पाकिस्तानच्या संसदेत सोमवारी पंतप्रधानपदासाठी मतदान झाले. शाहबाज यांना १७४ मते मिळाली. माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षाकडून शाह महमूद कुरेशी पंतप्रधानपदाचे उमेदवार होते. मात्र, ऐनवेळी त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली. त्याचवेळी पीटीआयच्या सर्व सदस्यांनी राजीनामा देत निवडणुकीवर बहिष्कार टाकला. त्यामुळे मतदान घेऊन शाहबाज यांच्या निवडीची औपचारिकता पूर्ण करण्यात आली. पाकिस्तानातील सत्तासंघर्षात इम्रान खान यांची विकेट काढत विरोधी पक्षांनी सत्ता ताब्यात घेतली आहे. अविश्वास ठरावा वेळी पळ काढणाऱ्या इम्रान आणि त्यांच्या पक्षाच्या सदस्यांनी सोमवारी पुढचे पाऊल टाकले. पंतप्रधानपदासाठी मतदान होण्याआधीच सर्व सदस्यांनी थेट राजीनामा दिला. त्यानंतर शाहबाज यांच्या निवडीची प्रक्रिया पूर्ण केली गेली. पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर शाहबाज यांनी संसदेला संबोधित केले. यावेळी संसदेत बोलताना त्यांनी इम्रानला लक्ष्य करतानाच भारत- पाक संबंधांवरही भाष्य केले.

‘‘पाकिस्तानात अविश्वास ठरावाच्या माध्यमातून प्रथमच एखादं सरकार कोसळलं आहे. आपल्याला प्रगती हवी असेल तर डेडलॉक ऐवजी डायलॉगवर भर द्यावा लागेल,’’ असे सांगतानाच ‘‘पाकिस्तानात सत्ताबदल करण्यासाठी विदेशातून दबाव असल्याचे दावे केले गेले. हा आरोप सिद्ध करणारे पुरावे मिळाल्यास मी त्याचक्षणी पंतप्रधानपदाचा राजीनामा देईन,’’ असे शाहबाज यांनी सांगितले.

शाहबाज यांनी आपल्या पहिल्याच भाषणात काश्मीरचा रागही आळवला. जम्मू आणि काश्मीरमधून भारताने कलम ३७० हटवल्यानंतर इम्रान सरकारने त्याविरुद्ध पाऊल उचलणे आवश्यक होते. मात्र, तसे झाले नाही. आम्हाला भारतासोबत चांगले संबंध हवे आहेत पण काश्मीर प्रश्न सुटेपर्यंत ते शक्य नाही. काश्मीरबाबत आमची भूमिका बदलू शकत नाही. त्यांना यापुढेही सर्व बाबतीत आम्ही पाठिंबा देत राहू. काश्मिरी जनतेच्या इच्छेनुसार हा प्रश्न सोडवला गेला पाहिजे, हा माझा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संदेश असेल, असे ते म्हणाले.

शाहबाज शरीफ यांचा परिचय

१९५० साली लाहोरमध्ये जन्मलेले शाहबाज शरीफ हे पाकित्सानचे माजी पंतप्रधान नबाझ शरीफ यांचे धाकटे बंधू आहेत. त्यांनी आजवर १९९७-९९, २००८-१३, २०१३-१८ असे तीनवेळा पाकिस्तानातील पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे. ते स्वत:ला कधी मुख्यमंत्री म्हणत नसत तर खदीम- ए-आला अर्थात जनतेचा मुख्य सेवक म्हणून ओळख सांगत. शाहबाज हे पाकिस्तानातील एक नामांकीत उद्योजक आहेत. इत्तेफाक ग्रुप ऑफ कंपनीजचे ते भागिदार आहेत.

पाक राष्ट्रपतींऐवजी सभापतींनी दिली शपथ

पाकिस्तानचे नवे पंतप्रधान म्हणून शाहबाज शरीफ यांचा शपथविधी होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे राष्ट्रपती अरिफ अल्वी यांची तब्येत अचानक बिघडली. अल्वी यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने डॉक्टरांनी त्यांना तपासून काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे हा शपथविधी होणार की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, नॅशनल असेम्ब्लीच्या सभापतींनी शाहबाज शरीफ यांना रात्री उशिरा पंतप्रधानपदाची शपथ दिली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in