बीजिंग : चिनी शास्त्रज्ञांनी डुकराच्या शरीरात मानवीकृत मूत्रपिंड (ह्युमनाइज्ड किडनी) वाढवण्यात यश मिळवले आहे. हे संशोधन अद्याप प्राथमिक स्वरूपात असले तरी भविष्यात त्यातून मानवी अवयव प्रत्यारोपणाच्या क्षेत्रात मोठी संधी निर्माण होऊ शकते, असा विश्वास शास्त्रज्ञांना वाटत आहे. सेल स्टेम सेल नावाच्या वैद्यकीय जर्नलमध्ये हा अभ्यास प्रकाशित झाला आहे.
प्रत्यारोपणासाठी मानवी किडनी मिळवणे बऱ्याचदा दुरापास्त असते. तशी ती मिळाली तरी प्रत्यारोपण केलेल्या रुग्णाच्या शरीरात ती स्वीकारली जाण्याची शाश्वती नसते. बाहेरून आलेली कोणतीही वस्तू हानिकारक समजून तिला विरोध करण्याची मानवी शरीराची नैसर्गिक वृत्ती असते. या अडचणी लक्षात घेऊन शास्त्रज्ञांनी अन्य प्राण्यांची किडनी मानवामध्ये प्रत्यारोपित करण्याची शक्यता आजमावून पाहिली. या शास्त्राला झेनोट्रान्सप्लांटेशन असे म्हटले जाते. मात्र, तेव्हाही मानवी शरीराने अन्य प्राण्याची किडनी स्वीकारण्यास अडचणी निर्माण केल्या.
मानवी रोगप्रतिकारक प्रणाली दुसऱ्या प्रजातीच्या अवयवांना नाकारण्यास प्रवृत्त असल्याने शास्त्रज्ञांनी डुकराच्या शरीरात विकसित केल्या जाणाऱ्या मानवी किडनीत जनुकीय बदल केले. त्यामुळे डुकराच्या शरीरात मानवासारखी किडनी (ह्युमनाइज्ड) विकसित होण्यातील, तसेच डुकरामध्ये तयार झालेली किडनी मानवी शरीरात स्वीकारली जाण्यातील अडचणी कमी झाल्या. हे या संशोधनाचे मोठे यश आहे. यापूर्वी शास्त्रज्ञांनी उंदरांच्या शरीरात मानवीकृत अवयव विकसित करण्याचे प्रयत्न करून पाहिले होते, पण त्यांना फारसे यश आले नव्हते. त्यावर मात करण्यासाठी शास्त्रज्ञांनी मानवी आणि डुकराच्या दोन्ही पेशी असलेल्या एकत्रित भ्रूणाची निर्मिती केली. अशा पेशींना चिमेरा पेशी म्हणतात. त्यांच्यापासून बनलेले भ्रूण डुकराच्या शरीरात वाढवले असता त्यांना फारसा विरोध उत्पन्न झाला नाही आणि ते अवयव मानवी शरीरात स्वीकारले जाण्याची शक्यता वाढली.
हे संशोधन अद्याप सुरुवातीच्या टप्प्यात आहे, पण भविष्यात त्यातून मोठी संधी निर्माण होऊ शकते. या तंत्रज्ञानात पुरेशी प्रगती झाली की, माणसाला मानवी अवयवांच्या पुरवठ्यावर अवलंबून राहावे लागणार नाही. गरजेचे अवयव अन्य प्राण्यांच्या शरीरात विकसित करून ते मानवी शरीरात प्रत्यारोपित करता येऊ शकतील. त्यातून अनेक जणांना जीवदान मिळू शकते.
किडनीच्या मागणी आणि पुरवठ्यात तफावत
मूत्रपिंड हा मानवांमध्ये सर्वात जास्त प्रत्यारोपित केला जाणारा अवयव आहे. एकट्या अमेरिकेत २०२२ सालात २५ हजारांहून अधिक मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आल्या. ही मूत्रपिंडे जिवंत आणि मृत दोन्ही दात्यांकडून मिळवली होती. किडनीच्या मागणी आणि पुरवठ्यात मोठी तफावत आढळते. किडनी मिळविण्याची प्रतीक्षा यादी खूप लांब असू शकते. अमेरिकेत २०२० सालात ९० हजारहून अधिक लोक किडनी देणगीच्या प्रतीक्षेत होते आणि दरवर्षी सुमारे ५००० लोक किडनी मिळण्यापूर्वीच मरण पावतात.