वॉशिंग्टन : खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नू याच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी अमेरिकेने भारतीय नागरिक विकास यादव याच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. हत्येच्या कटाबरोबरच मनी लाँड्रिंगचा आरोपही त्यांच्यावर लावला आहे.
अमेरिकेची तपास यंत्रणा फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन(FBI)ने सांगितले की, विकास हा भारताची गुप्तचर यंत्रणा 'रॉ'शी संबंधित होता, मात्र, भारत सरकारने विकासला त्याच्या पदावरून हटवून अटक केल्याचे अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याचे म्हणणे आहे. दरम्यान, भारताने एफबीआय व अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याच्या या दाव्यावर कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही. दरम्यान, एफबीआयने विकास यादव याला वॉन्टेट लिस्टमध्ये टाकले आहे.
विकास यादव हा अमेरिकेत राहत होता. त्यानंतर तो काही दिवसांपूर्वी भारतात आला होता. तो हरयाणातील रेवाडी जिल्ह्याचे रहिवासी आहे. त्याच्या अटकेचे वृत्त १० ऑक्टोबरला आले.
पन्नूच्या हत्येच्या कटप्रकरणी अमेरिकेतील कोर्टाने दोन जणांना आरोपी बनवले होते. त्यात निखिल गुप्ता आणि 'सीसी१' या नावाचा इसम सामील असल्याचे म्हटले होते. आता एफबीआयने 'सीसी१' हा इसम म्हणजे विकास यादव असल्याचे सांगितले.