वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एच-१बी व्हिसाद्वारे परदेशी कामगारांना अमेरिकेत आणणाऱ्या कंपन्यांवर लादलेले १,००,००० डॉलरचे (सुमारे ८४ लाख रुपये) शुल्क आणखी एका वर्षासाठी वाढवले आहे, अशी माहिती व्हाईट हाऊसने दिली आहे. शुक्रवारी जारी केलेल्या जाहीरनाम्यात ट्रम्प यांनी नमूद केले की, २०२५ मध्ये १ लाख डॉलरचे शुल्क लागू करण्याच्या निर्णयामुळे मोठ्या आयटी आऊटसोर्सिंग कंपन्यांच्या एच-१बी नोंदणीमध्ये ९२ टक्क्यांची मोठी घट झाली आहे.
शुल्क आकारणीचा २०२५ मधील हा निर्णय सध्या कायदेशीर अडचणीत सापडला असून, हे प्रकरण अमेरिकेच्या दोन वेगवेगळ्या फेडरल न्यायालयांसमोर प्रलंबित आहे. शुल्कवाढीचा हा आदेश या महिन्यात संपुष्टात येत होता. हा निर्णय आधीपासूनच अमेरिकेत विद्यार्थी व्हिसावर असलेल्या परदेशी नागरिकांना तसेच विद्यमान व्हिसाच्या नूतनीकरणाला लागू नव्हता. नव्या एच-१बी व्हिसाधारकांमध्ये विद्यार्थ्यांचा मोठा वाटा आहे.