हमास-इस्रायल संघर्ष :दुसऱ्या दिवशी युद्धविरामाचे पालन, ओलिसांच्या अदलाबदलीची तयारी

हमास-इस्रायल संघर्ष :दुसऱ्या दिवशी युद्धविरामाचे पालन, ओलिसांच्या अदलाबदलीची तयारी

शुक्रवारी हमासने इस्रायल आणि अन्य देशांच्या २४ ओलिसांची सुटका केली. तर इस्रायलने त्यांच्या ताब्यातील ३९ पॅलेस्टिनी नागरिकांची मुक्तता केली

तेल अवीव : हमास आणि इस्रायल यांच्यात कतारच्या मध्यस्थीने झालेल्या करारानुसार शुक्रवारी चार दिवसांच्या युद्धविरामाची अंमलबजावमी सुरू झाली. शनिवारी दुसऱ्या दिवशीही युद्धविराम पाळण्यात आला. तसेच दोन्ही बाजूंकडील ओलिसांच्या दुसऱ्या तुकडीची अदलाबदल करण्याची तयारी पूर्ण करण्यात आली. मात्र, रात्री उशिरापर्यंत प्रत्यक्ष अदलाबदलीचे वृत्त आले नव्हते. दरम्यान, शुक्रवारी सुटका झालेल्या ओलिसांची त्यांच्या कुटुंबीयांबरोबर भेट झाल्याने दोन्ही बाजूस आनंदाचे वातावरण होते. पण त्याबरोबरच पुढील ओलिसांच्या सुटकेबाबत तणावपूर्ण उत्सुकताही जाणवत होती.

शुक्रवारी हमासने इस्रायल आणि अन्य देशांच्या २४ ओलिसांची सुटका केली. तर इस्रायलने त्यांच्या ताब्यातील ३९ पॅलेस्टिनी नागरिकांची मुक्तता केली. शनिवारी हमासने १४ तर इस्रायलने ४२ ओलिसांची सुटका करणे अपेक्षित होते. इस्रायलच्या ताब्यातील पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका नेमकी कोणत्या ठिकाणी केली जाणार आहे, याची माहिती मिळाली नसल्याचा दावा पॅलेस्टिनींनी केला. त्यामुळे शनिवारची नियोजित प्रक्रिया पार पडली की नाही, हे रात्री उशिरापर्यंत स्पष्ट होऊ शकले नाही.

करारानुसार इस्रायलने गाझा पट्टीत आणखी मानवतावादी मदत पाठवण्यास सुरुवात केली आहे. मात्र, ही मदत म्हणजे समुद्रात काही थेंबांसारखी असल्याचे अनेक निरीक्षकांचे मत आहे. गाझा पट्टीत जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती अनेक पटींनी वाढल्या असून त्यावर मात करण्यास ही मदत अपुरी असल्याचे सांगितले जात आहे.

इस्रायली मालकीच्या जहाजावर हल्ला

हिंदी महासागरात इराणच्या संशयित हल्ल्यात इस्रायली मालकीच्या जहाजाला लक्ष्य करण्यात आल्याची माहिती अमेरिकन संरक्षण अधिकाऱ्याने शनिवारी दिली आहे. जहाजाला शाहेद-१३६ ड्रोनने लक्ष्य केले असल्याचा संशय आहे. त्यात जहाजाचे नुकसान झाले,परंतु त्यातील कोणत्याही कर्मचाऱ्याला इजा झाली नाही.

logo
marathi.freepressjournal.in