हमासचा नेता इस्माईल हनिये इजिप्तमध्ये- गाझातील युद्धबंदी, ओलिसांच्या सुटकेवर चर्चा

इस्माईल हनिये, मुसा अबू मार्झुक आणि खलीद मशाल हे हमासचे तीन सर्वोच्च नेते असून ते कतारमध्ये राहतात. या तिघांनी मिळून ११ अब्ज डॉलर्सची संपत्ती गोळा केली आहे.
हमासचा नेता इस्माईल हनिये इजिप्तमध्ये- गाझातील युद्धबंदी, ओलिसांच्या सुटकेवर चर्चा
PM

कैरो : हमासचा वरिष्ठ नेता इस्माईल हनिये याने बुधवारी इजिप्तची राजधानी कैरोला भेट दिली असून गाझातील युद्धबंदीच्या संभाव्य प्रस्तावावर इजिप्तच्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली.

 इस्माईल हनिये, मुसा अबू मार्झुक आणि खलीद मशाल हे हमासचे तीन सर्वोच्च नेते असून ते कतारमध्ये राहतात. या तिघांनी मिळून ११ अब्ज डॉलर्सची संपत्ती गोळा केली आहे. सध्या सुरू असलेल्या हमास-इस्रायल युद्धात आतापर्यंत हजारो पॅलेस्टिनी नागरिकांचा जीव गेला आहे आणि अन्य लोकांना अतोनात यातना सहन कराव्या लागत आहेत. मात्र, हे तिन्ही नेते त्याची फारशी पर्वा न करता कतारमध्ये ऐश-आरामाचे जीवन जगत आहेत. हमासचा गाझा पट्टीतील नेता याह्या सिन्वर हा युद्ध सुरू झाल्यापासून परागंदा झाला आहे. इस्रायलवरील ७ ऑक्टोबरच्या हल्ल्याचे नियोजन सिन्वर यानेच केले होते. इस्रायलने सिन्वर याला ठार मारण्याचा चंग बांधला आहे.

 या पार्श्वभूमीवर हनिये याचे इजिप्तमध्ये येणे महत्त्वाचे मानले जात आहे. तो सहसा कतारबाहेर प्रवास करत नाही. हमास-इस्रायल युद्धात गेल्या महिन्यात सात दिवसांची तात्पुरती युद्धबंदी झाली होती. त्याच्या वाटाघाटी करण्यासाठी त्यांने गतवेळी इजिप्तला भेट दिली होती. त्या काळात काही ओलिसांची सुटका झाली होती. त्यानंतर बुधवारी तो कैरोमध्ये आला आहे. हमासने आपा पुन्हा तात्पुरत्या युद्धविरामाला मंजुरी दिलेली नाही. इस्रायलने युद्ध पूर्णपणे थांबवल्याशिवाय ठोस वाटाघाटी होणार नाहीत, अशी हमासची भूमिका आहे. तर हमासने उर्वरित ओलिसांची सुटका केल्याशिवाय आणि हमासचा पुरता बिमोड केल्याशिवाय युद्ध थांबवले जाणार नाही, असे इस्रायलचे धोरण आहे. त्यामुळे कैरोतील चर्चेतून काय निष्पन्न होणार, याबाबत तर्क लावले जात आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in