जेरुसलेम : इस्रायलने तेहरानमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात हमासचा राजकीय नेता इस्माईल हानिये ठार झाल्यानंतर आता गाझा पट्ट्यात जुलै महिन्यात करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यात हमासचा लष्करप्रमुख मोहम्मद देइफ हा ठार झाल्याचे इस्रायलच्या लष्कराने गुरुवारी सांगितले.
गाझाच्या दक्षिणेकडील खान युनुस शहरात १३ जुलै रोजी इस्रायलने देइफला लक्ष्य केले. हवाई हल्ला करून घडविण्यात आलेल्या स्फोटात मोहम्मद देइफ ठार झाल्याचा दावा इस्रायलने केला. मात्र हमासने हा दावा खोडून काढला होता. जवळच्या तंबूमध्ये आश्रय घेतलेल्या विस्थापितांसह या हल्ल्यात ९० हून अधिक जण ठार झाले होते, असे गाझातील आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
या हवाई हल्ल्यात मोहम्मद देइफ ठार झाल्याचे इस्रायलने गुरुवारी गुप्तचर यंत्रणांचा हवाला देत स्पष्ट केले. मात्र हमासकडून त्यावर तातडीने प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. या हल्ल्यात हात असल्याचा दावा अथवा इन्कार इस्रायलने केला नाही, मात्र इराणने हल्ल्याचा बदला घेण्याचा निर्धार केला आहे.
हमासचा नेता सिनवरचा खात्मा करण्याचा इस्रायलचा निर्धार
देइफ आणि हानयेह यांच्यासह हमासचा अन्य नेता येह्य सिनवर याचाही खात्मा करण्याचा निर्धार इस्रायलने केला आहे, मात्र अद्याप तो सगळ्यांनाच हुलकावणी देत आहे. इस्रायलमध्ये ७ ऑक्टोबर रोजी हमासने हल्ला केला होता. त्यामध्ये जवळपास १२०० जण ठार झाले होते आणि अन्य २५० जणांना ओलीस ठेवण्यात आले होते.