

लंडन : लंडन येथील प्रसिद्ध थेम्स नदीच्या काठावर रविवारी एक ऐतिहासिक आणि नयनरम्य सोहळा पार पडला. भारतामधील पवित्र गंगा नदीच्या काठावर होणाऱ्या आरतीच्या धर्तीवर थेम्स नदीवर पहिल्यांदाच 'गंगा आरती'चे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला हजारो भाविकांनी उत्स्फूर्त उपस्थिती लावली.
'चिन्मय मिशन यूके'च्या ७५ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून आणि वार्षिक 'टोटली थम्स फेस्टिव्हल'च्या संयुक्त विद्यमाने 'थेम्सवर गंगा आरती: प्रकाश आणि कृतज्ञतेचा उत्सव' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. निसर्ग, ज्ञान आणि चेतनेच्या प्रवाहाचे प्रतीक म्हणून या कार्यक्रमाची संकल्पना मांडण्यात आली होती.
एकतेचा, संवादाचा संदेश
चिन्मय मिशनचे जागतिक प्रमुख स्वामी स्वरूपानंद यांनी सांगितले, लंडनच्या मध्यभागी थेम्स नदीच्या काठावर एकत्र येत गंगा मातेचे स्मरण करणे आणि तिचा आध्यात्मिक प्रवाह व संस्कृतीचा आदर करणे हा यामागचा मुख्य उद्देश होता. जेव्हा आपण भक्तिभावाने एकत्र येतो, तेव्हा सर्व मतभेद बाजूला सारून प्रेमाचा आणि एकतेचा संदेश पसरवला जातो. स्वामी चिन्मय नंदांनी हिमालयाच्या शिखरांवरून वेदांताचे जे ज्ञान आणले, तेच ज्ञान सर्वांमध्ये एकच अखंड सत्य असल्याचे शिकवते. चिन्मय मिशन यूकेच्या निवासी शिक्षिका ब्रह्मचारिणी श्रीप्रिया चैतन्य म्हणाल्या, पिढ्यानपिढ्या लोक गंगा नदीच्या काठावर निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एकत्र येतात. थम्स नदीवरील गंगा आरतीनेही तोच आत्मा जपला असून लोकांना कृतज्ञता, आशा आणि एकतेच्या धाग्यात बांधण्याचे काम केले आहे.
पर्यावरणपूरक आयोजन
या सोहळ्यात पारंपरिक बहुस्तरीय दिव्यांची आरती, प्रार्थना आणि संगीताचा समावेश होता. मात्र, थेम्स नदीचे प्रदूषण होऊ नये याची विशेष खबरदारी घेण्यात आली होती. चिन्मय मिशनच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, आरतीचा संपूर्ण सोहळा केवळ नदीकाठावरच पार पडला. कोणतेही दिवे किंवा साहित्य नदीच्या पात्रात विसर्जित करण्यात आले नाही. तसेच, एकवेळ वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकचा वापर टाळून हा कार्यक्रम पूर्णपणे पर्यावरणपूरक ठेवण्यात आला होता. ग्रीनविच येथील ऐतिहासिक 'ओल्ड रॉयल नेव्हल कॉलेज'च्या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या या सोहळ्यात ब्रिटनमधील अनेक हिंदू संस्थांचे प्रतिनिधी, आध्यात्मिक नेते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
१९९७ पासून थेम्स नदीच्या संवर्धनासाठी आणि संस्कृतीच्या प्रसारासाठी 'टोटली थेम्स फेस्टिव्हल' आयोजित केला जातो. यावर्षीच्या या पहिल्या वहिल्या गंगा आरतीला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद पाहता, हा सोहळा आता दरवर्षी आयोजित केला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.