निपाहवरील लसीच्या मानवी चाचण्या सुरू; ऑक्सफर्डच्या शास्त्रज्ञांकडून ५१ रुग्णांवर संशोधन

निपाह विषाणूचा पहिला संसर्ग १९९८ साली मलेशिया आणि सिंगापूरमधील वराहपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना झाला
निपाहवरील लसीच्या मानवी चाचण्या सुरू; ऑक्सफर्डच्या शास्त्रज्ञांकडून ५१ रुग्णांवर संशोधन

लंडन : निपाह विषाणूचा संसर्ग रोखण्यास उयुक्त ठरेल, अशा लसीच्या मानवी चाचण्यांना ब्रिटनमधील ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी नुकतीच सुरुवात केली असून त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

'चॅडॉक्स १ निपाह बी' असे या लसीचे नाव आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या पॅन्डेमिक सायन्सेस इन्स्टिट्यूटतर्फे ही लस विकसित केली आहे. या संशोधन प्रकल्पासाठी ऑक्सफर्ड व्हॅक्सिन ग्रुपने पुढाकार घेतला असून त्याला कोॲलिशन फॉर इपिडेमिक प्रिपेअर्डनेस इनोव्हेशन्सने (सेपी) अर्थसहाय्य केले आहे. या लसीच्या मानवी चाचणीत १८ ते ५५ वयोगटातील ५१ जण सहभागी होत आहेत. या चाचण्या १८ महिने चालणार आहेत. त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर प्रत्यक्ष साथ पसरलेल्या देशांमध्ये लसीच्या पुढील चाचण्या घेण्यात येणार आहेत. ही लस तयार करण्यासाठी ऑक्सफर्डच्या शास्त्रज्ञांनी ॲस्ट्राझेनेकाच्या कोविड-१९ लसीप्रमाणेच तंत्रज्ञान वापरले आहे.

निपाह विषाणूचा पहिला संसर्ग १९९८ साली मलेशिया आणि सिंगापूरमधील वराहपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना झाला. मलेशियातील निपाह या गावात त्याची सुरुवात झाल्याने विषाणूला निपाह नाव पडले. गेल्या २५ वर्षांत त्याचा प्रसार भारत, बांगलादेश आदी आशियाई देशांमध्ये झाला आहे. गतवर्षी सप्टेंबर महिन्यात केरळमध्ये या विषाणूची साथ पसरली. त्यात सहा जणांना बाधा झाली आणि त्यातील दोघांचा मृत्यू झाला. गेल्या पाच वर्षांतील केरळमधील ही चौथी निपाह साथ होती. या संसर्गामुळे ताप, डोकेदुखी, खोकला, श्वसनाला त्रास, मेंदूला सूज आदी लक्षणे दिसतात. या रोगाचा मृत्यूदर ४० ते ७५ टक्के असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) म्हणणे आहे.

दोन अब्ज लोकांसाठी लस महत्त्वाची

निपाह विषाणू फळांवर उपजिविका करणाऱ्या वटवाघळांमध्ये वाढतात आणि त्यांच्या मलमूत्राचा संपर्क आल्यावर मानवामध्ये पसरतात. अशा वटवाघळांची वस्ती असलेल्या प्रदेशात जगातील साधारण दोन अब्ज लोक राहतात. त्यांच्या आरोग्याच्या रक्षणासाठी या लसीच्या चाचणीला महत्त्व आहे, असे मत 'सेपी'चे अधिकारी इन-क्यू यून यांनी व्यक्त केले.

logo
marathi.freepressjournal.in