भुकेकंगाल पाकिस्तानचा अण्वस्त्रांचा हव्यास संपेना- फेडरेशन ऑफ अमेरिकन सायंटिस्ट्स संस्थेचा अहवाल

पेट्रोलचे दर प्रतिलिटर ३०० रुपयांच्या वर गेले आहे
भुकेकंगाल पाकिस्तानचा अण्वस्त्रांचा हव्यास संपेना- फेडरेशन ऑफ अमेरिकन सायंटिस्ट्स संस्थेचा अहवाल

इस्लामाबाद : भारत आणि पाकिस्तान हे अवघ्या दोन मिनिटांच्या फरकाने स्वतंत्र झालेले देश. मात्र, आज स्वातंत्र्याच्या ७५व्या वर्षी भारत चंद्र-सूर्याच्या दिशेने याने सोडत आहे आणि पाकिस्तानची अवस्था भुकेकंगाल आहे. पाकिस्तानची राजकीय आणि आर्थिक घडी विस्कटली आहे. देशात अन्नधान्याच्या वस्तूंचा तुटवडा असून त्यांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. पेट्रोलचे दर प्रतिलिटर ३०० रुपयांच्या वर गेले आहे. आर्थिक मदतीसाठी जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसारख्या वित्तसंस्था आणि चीन व सौदी अरेबियासारखे मित्र देश यांच्या हातापाया पडावे लागत आहे. नागरिकांना अतोनात हाल सहन करावे लागत आहेत. तरीही पाकिस्तानची युद्धाची खुमखुमी गेलेली नाही. भारतीय प्रदेशात दहशतवादी पाठवणे सुरूच आहे. जनतेच्या तोंडी दोन वेळचा घास धड पडत नसताना पाकिस्तानचा अण्वस्त्रांचा हव्यास काही सुटत नाही. फेडरेशन ऑफ अमेरिकन सायंटिस्ट्स नावाच्या संस्थेने या संदर्भातील अहवाल नुकताच प्रसिद्ध केला आहे. त्यात पाकिस्तानकडे सुमारे १७० अण्वस्त्रे असून ती कोठे, कोणत्या स्वरूपात ठेवली आहेत, याचाही तपशील दिला आहे.

फेडरेशन ऑफ अमेरिकन सायंटिस्ट्सच्या अहवालात म्हटले आहे की, पाकिस्तानकडे सध्या १७० अण्वस्त्रे आहेत. तेथील अणुप्रकल्पांमध्ये अण्वस्त्रे बनवण्यालायक द्रव्यांचे उत्पादन अव्याहतपणे सुरू आहे. त्याच्या आधारे पाकिस्तान दरवर्षी त्यांच्या अण्वस्त्रसाठ्यात १४ ते २७ नवीन अण्वस्त्रांची भर घालू शकतो. कृत्रिम उपग्रहांद्वारे पाकिस्तानच्या विविध अण्वस्त्रनिर्मिती प्रकल्प, सेनादलांचे तळ, क्षेपणास्त्र प्रक्षेपण तळ आदींची घेतलेली छायाचित्रे आणि अन्य माहितीच्या विश्लेषणातून संस्थेने हा अहवाल तयार केला आहे.

या अहवालानुसार पाकिस्तानी हवाईदलातील मिराज-३, मिराज-४ आणि जेएफ-१७ विमाने अण्वस्त्रे वाहून नेण्यास सक्षम आहेत. अशी साधारण ३६ विमाने पाकिस्तानी हवाईदलात असून त्यावरून अण्वस्त्रे टाकण्याची क्षमता पाकिस्तानने १९९८ सालीच मिळवली होती. ही विमाने २००० किमी अंतरापर्यंत मारा करू शकतात. ही विमाने कराचीजवळचा मसरूर हवाई तळ, देशाच्या मध्य प्रांतातील शाहबाज हवाई तळ, उत्तरेकडील रफिकी आणि मिनहास (कामरा) हवाई तळ येथे तैनात असतात.

याशिवाय जमिनीवरून जमिनीवर मारा करू शकणाऱ्या विविध पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांद्वारेही पाकिस्तान अण्वस्त्रे डागू शकतो. त्यात अब्दाली, गझनवी, शहीन, घौरी, अबाबील आणि बाबर या मालिकेतील क्षेपणास्त्रांचा समावेश आहे. या क्षेपणास्त्रांचा पल्ला २०० ते २७५० किमीपर्यंत आहे. यातील अब्दाली, गझनवी, शहीन आणि घौरी ही क्षेपणास्त्रे पारंपरिक प्रकारची (बॅलिस्टिक) आहेत. तर बाबर हे क्रूझ प्रकारचे क्षेपणास्त्र आहे. ही क्षेपणास्त्रे मोठ्या आकाराचे अणुबॉम्ब डागू शकतात, पण अशा प्रकारची महाविध्वंसक अस्त्रे वापरताना बराच आंतरराष्ट्रीय दबाव येतो. ती अस्त्रे प्रत्यक्ष वापरण्याची नसून केवळ शत्रूला धाक दाखवण्याच्या (डिटेरन्स) कामी येतात. त्यामुळे प्रत्यक्ष रणभूमीवर वापरता येतील अशी लहान आकाराची अण्वस्त्रेही (टॅक्टिकल न्यूक्लिअर वेपन्स) पाकिस्तानने विकसित केली आहेत. पाकिस्तानच्या नस्र नावाच्या क्षेपणास्त्रांवर अशी लघु क्षमतेची अण्वस्त्रे बसवली आहेत. नस्र क्षपणास्त्राचा पल्ला ६० ते ७० किमी आहे. भारतीय सैन्याने पंजाब किंवा राजस्थानच्या सपाट भूमीतून रणगाड्यांनिशी हल्ला केल्यास तो थोपवण्यासाठी प्रामुख्याने नस्रचा वापर केला जाईल. ही क्षेपणास्त्रे पाकिस्तानी सैन्याच्या अक्रो, गुजरनवाला, खुजदार, पानो अकील आणि सरगोधा येथील तळांवर तैनात आहेत.

याशिवाय पाकिस्तानकडे बाबर क्षेपणास्त्रांची नौदल आवृत्तीही आहे. ही क्षेपणास्त्रे नोदल तळ, युद्धनौका किंवा पाणबुड्यांवरून डागता येतात. अबाबील आणि शहीन-३ ही क्षेपणास्त्रे एकाच वेळी अनेक अण्वस्त्रे (एमआयआरव्ही) डागू शकतात.

- पाकिस्तानी अण्वस्त्रांची संख्या - १७०

- दरवर्षी १४ ते २७ नवीन अण्वस्त्रांची भर घालण्याची क्षमता

- अण्वस्त्रे वाहून नेऊ शकणारी विमाने - मिराज-३, मिराज-४ आणि जेएफ-१७

- अण्वस्त्रवाहू विमानांचे तळ - मसरूर, शाहबाज, रफिकी आणि मिनहास (कामरा)

- अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्रे - अब्दाली, गझनवी, शहीन, घौरी, अबाबील, बाबर, नस्र

- क्षेपणास्त्र तळ - अक्रो, गुजरनवाला, खुजदार, पानो अकील आणि सरगोधा

- अणुप्रकल्प - काहुटा, चष्मा, कराची, खुशाब, चगाई, रावळपिंडी, इसा खेल, गोलरा शरीफ

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in