मी परत येईन, शेख हसीना यांची समर्थकांना ग्वाही

अल्लाहने मला एका कारणासाठी जिंवत ठेवले आहे. तो मला काही चांगले काम करायला सांगतो, मी बांगलादेशमध्‍ये परत येईन, जे गुन्हे करत आहेत त्यांना शिक्षा होईल हे माझे वचन आहे, अशी ग्वाही बांगलादेशच्‍या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्‍या समर्थकांना दिली.
मी परत येईन, शेख हसीना यांची समर्थकांना ग्वाही
X- @saifahmed75
Published on

नवी दिल्ली : अल्लाहने मला एका कारणासाठी जिंवत ठेवले आहे. तो मला काही चांगले काम करायला सांगतो, मी बांगलादेशमध्‍ये परत येईन, जे गुन्हे करत आहेत त्यांना शिक्षा होईल हे माझे वचन आहे, अशी ग्वाही बांगलादेशच्‍या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्‍या समर्थकांना दिली. बांगलादेशातील हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्या अवामी लीग नेत्यांच्या कुटुंबीयांशी व्हर्च्युअल संवाद साधताना त्‍या बोलत होत्या.

एकेकाळी बांगलादेशकडे विकासाचे मॉडेल म्हणून पाहिले जात होते; पण आज देशाचे रूपांतर दहशतवादी देशात झाले आहे. मी माझे वडील, आई, भाऊ आणि कुटुंबातील सर्व सदस्य एकाच दिवसात गमावले. जवळच्या व्यक्तीला गमावण्याचे दुःख मला समजते, असेही हसीना यांनी म्हटले आहे.

यावेळी शेख हसीना यांनी बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांच्यावर निशाणा साधला. त्‍या म्‍हणाल्‍या की, मोहम्मद युनूस यांच्‍यावर बांगलादेशमधील जनतेने कधीच प्रेम केले नाही. ते लोकांना जास्त व्याजदराने थोडे पैसे उधार देत आणि त्या पैशाने परदेशात विलासी जीवन जगत होते. आम्हालाही त्यांचा दुटप्‍पी स्वभाव समजला नाही. आमच्या सरकारनेही त्यांना मदत केली; पण जनतेला त्याचा फायदा झाला नाही. मोहम्मद युनूसच्या सत्तेच्या भूकेमुळे बांगलादेश आज जळत आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला.

आपल्या नेत्यांना ज्या पद्धतीने मारण्यात आले त्याचे वर्णनही करता येणार नाही. अवामी लीग नेते, पोलीस, वकील, पत्रकार आणि कलाकार सर्वांना लक्ष्य केले जात आहे. मी माझे वडील, आई, भाऊ आणि कुटुंबातील सर्व सदस्य एकाच दिवसात गमावले. त्यावेळीही मला देशात परतण्याची परवानगी नव्हती. जवळच्या व्यक्तीला गमावण्याचे दुःख मला समजते. अल्लाहने मला वाचवले आणि तो मला काही चांगले काम करायला सांगतो. जे गुन्हे करत आहेत त्यांना शिक्षा होईल. हे माझे वचन आहे, अशी ग्वाहीही हसीना यांनी दिली.

बांगलादेश सरकार शेख हसीना यांचे प्रत्यार्पण करण्याचा प्रयत्न करत आहे. बांगलादेशातील अल्पसंख्यांक हिंदूंवरील हल्ल्यांच्या घटनांबद्दल पंतप्रधान मोदींनी मोहम्मद युनूस यांच्याकडे चिंता व्यक्त केली होती.

logo
marathi.freepressjournal.in