रशियावर क्षेपणास्त्र डागल्यास अण्वस्त्राचा वापर करणार; राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची नव्या धोरणावर स्वाक्षरी

कोणताही देश अण्वस्त्र सज्ज देशाच्या मदतीने रशियावर हल्ला करीत असल्यास तो संयुक्त हल्ला समजला जाईल. या हल्ल्याला रशियाकडून अण्वस्त्राने प्रत्युत्तर दिले जाईल, असा आशय असलेल्या धोरणावर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी मंगळवारी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
रशियावर क्षेपणास्त्र डागल्यास अण्वस्त्राचा वापर करणार; राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची नव्या धोरणावर स्वाक्षरी
(संग्रहित छायाचित्र)
Published on

मॉस्को : कोणताही देश अण्वस्त्र सज्ज देशाच्या मदतीने रशियावर हल्ला करीत असल्यास तो संयुक्त हल्ला समजला जाईल. या हल्ल्याला रशियाकडून अण्वस्त्राने प्रत्युत्तर दिले जाईल, असा आशय असलेल्या धोरणावर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी मंगळवारी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. यामुळे जग अणुयुद्धाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे दिसत आहे.रशिया-युक्रेन युद्धाला हजार दिवस पूर्ण झाल्यानिमित्त पुतीन यांनी हा निर्णय घेतला आहे.

अमेरिकेतील बायडेन सरकारने युक्रेनला लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा वापर करण्याची परवानगी दिली आहे. यावर पुतीन यांनी सुधारित अणुधोरणावर केलेली स्वाक्षरी ही बायडेन यांच्या आदेशाला प्रत्युत्तर समजले जात आहे.

रशियाच्या नवीन अणुधोरणानुसार, रशियावर मोठा हवाई हल्ला झाल्यास त्याला प्रत्युत्तर म्हणून रशिया अण्वस्त्राचा वापर करू शकतो.

युद्ध चिघळण्याची भीती

युक्रेनला लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे वापरण्यास बायडेन प्रशासनाने परवानगी दिली आहे. अमेरिकेचे हे पाऊल युद्ध भडकवणारे आहे, अशी तिखट प्रतिक्रिया रशियाने दिली. अमेरिकेच्या परवानगीमुळे रशियाचे सैन्य तळ, सैन्य आस्थापना व महत्त्वाची ठिकाणे युक्रेनच्या लक्ष्य टप्प्यात आली आहेत. यामुळे रशिया-युक्रेन युद्धाची परिस्थिती अधिकच चिघळू शकते.

रशियाच्या यापूर्वीच्या अणुधोरणानुसार, रशियावर बॅलेस्टिक क्षेपणास्त्र हल्ल्याची विश्वसनीय सूचना मिळाल्यानंतरच रशिया अण्वस्त्र वापरू शकत होता. आता नवीन धोरणानुसार, बॅलेस्टिक क्षेपणास्त्रासोबत क्रूझ क्षेपणास्त्र, ड्रोन हल्ला किंवा उडणाऱ्या वाहनांवरून हल्ला झाल्यास अण्वस्त्र हल्ल्याला मंजुरी देण्यात आली आहे.

युक्रेनने पहिल्यांदाच डागली ‘एटीएसीएमएस’ क्षेपणास्त्रे

किव्ह : रशिया-युक्रेन युद्धाला एक हजार दिवस झाले असतानाच युक्रेनने पहिल्यांदाच अमेरिकेच्या ‘एटीएसीएमएस’ क्षेपणास्त्रांचा वापर रशियाविरोधात केला आहे. रशियाच्या अंतर्गत भागात हल्ला करण्यासाठी लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे युक्रेनने डागली. ही क्षेपणास्त्रे वापरण्याची परवानगी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी युक्रेनला दिल्यानंतर हा हल्ला करण्यात आला आहे.रशियाने युक्रेनविरोधातील युद्धात उत्तर कोरियाच्या सैनिकांना उतरवले आहे. त्यामुळे विद्यमान परिस्थिती पाहून रशियाच्या अंतर्गत भागात मारा करू शकणाऱ्या क्षेपणास्त्राच्या वापरासाठी परवानगी आवश्यक होती. रशियाच्या ब्रायस्क भागात ही क्षेपणास्त्र डागण्यात आली.

रशियन सैन्याचे मुख्य क्षेपणास्त्र तळ व तोफखाना महासंचालनालयाला याद्वारे लक्ष्य करण्यात आले, असे सूत्रांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in