
वॉशिंग्टन : निवडणूक प्रचारादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, आता अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर ट्रम्प यांनी मंगळवारी इराणवर निर्बंध घालण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली. इराणने माझी हत्या केली तर त्यांना नष्ट करा. इराणचे पृथ्वीवर काहीही शिल्लक राहणार नाही. जर मला काही झाले तर इराण पूर्णपणे नष्ट होईल, असे मी अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत, असे ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेदरम्यान सांगितले.
इराणची आर्थिक नाकेबंदी करण्याच्या आदेशावर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात राष्ट्राध्यक्ष निवडणुकीपूर्वी ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप अमेरिकेच्या न्याय विभागाने इराणवर केला होता. त्यानुसार, सप्टेंबरमध्ये इराणी अधिकाऱ्यांनी फरहाद शकेरी (५१) यांना ट्रम्प यांच्यावर लक्ष ठेवण्याचे आणि त्यांची हत्या करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, हा कट अमेरिकन एजन्सींनी उधळून लावला होता. आता ट्रम्प यांनी इराणविरोधात यापुढे कडक धोरण अवलंबले जाणार असल्याचे सूतोवाच केले. या निर्णयाच्या माध्यमातून त्यांनी इराणच्या इंधन निर्यातीला लक्ष्य केले आहे. इराणने अण्वस्त्र तयार करण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्यांच्यावर हे निर्बंध लादणे गरजेचे असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले.