इम्रान खान यांना सायफर प्रकरणात जामीन मात्र, तुरुंगातून सुटका नाही

पाकिस्तानी वकिलातीत अमेरिकेकडून आलेले गुप्त संदेश इम्रान खान यांनी राजकीय फायद्यासाठी उघड केल्याचे आरोप आहेत.
इम्रान खान यांना सायफर प्रकरणात जामीन
मात्र, तुरुंगातून सुटका नाही
PM

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांचे सहकारी शाह महमूद कुरेशी यांना सायफर प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी जामीन मंजूर केला. न्यायमूर्ती सरदार तारिक मसूद यांच्या अध्यक्षतेखालील आणि न्यायमूर्ती अतहर मिनाल्ला आणि सय्यद मन्सूर अली शाह यांचा समावेश असलेल्या तीन सदस्यीय खंडपीठाने ८ फेब्रुवारीच्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी हा आदेश जारी केला. तथापि, इम्रान खान तुरुंगातच राहतील. कारण तोशखाना भ्रष्टाचार प्रकरणात ते दोषी ठरले आहेत.

इम्रान खान यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले आहेत. त्यापैकी सायफर आणि तेशखाना ही महत्त्वाची प्रकरणे होती. पाकिस्तानी वकिलातीत अमेरिकेकडून आलेले गुप्त संदेश इम्रान खान यांनी राजकीय फायद्यासाठी उघड केल्याचे आरोप आहेत. हे सायफर प्रकरण म्हणून ओळखले जाते. त्यात त्यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे, तर तोशखाना प्रकरण सरकारी भेटवस्तू अवैधपणे विकल्याबाबतचे आहे. खान पंतप्रधान असताना विविध देशांच्या दौऱ्यांमध्ये त्यांना महागड्या भेटवस्तू मिळाल्या होत्या. त्या वस्तू सरकारी तिजोरीत, म्हणजे तोशखान्यात जमा करणे गरजेचे होते. पण खान यांनी तसे न करता त्या वस्तू घरी नेल्या आणि नंतर परस्पर मोठ्या किमतीला विकल्या. त्या प्रकरणात ते दोषी ठरले असून शिक्षा भोगत आहेत. त्यामुळे सायफर प्रकरणात जामीन मंजूर झाला असला तरी तूर्तास खान यांची तुरुंगातून सुटका होणार नाही.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in