पाकिस्तानात इम्रान खान यांचा पक्ष आघाडीवर;नवाझ शरीफ यांच्या पक्षाबरोबर रस्सीखेच

पाकिस्तानात इम्रान खान यांचा पक्ष आघाडीवर;नवाझ शरीफ यांच्या पक्षाबरोबर रस्सीखेच

पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीत (संसद) एकूण ३३६ जागा आहेत. त्यापैकी २६६ जागांसाठी गुरुवारी मतदान पार पडले.

इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये गुरुवारी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल शुक्रवारी जाहीर होऊ लागले असून सायंकाळपर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाला निसटती आघाडी मिळाली होती. तर नवाझ शरीफ यांचा पाकिस्तान मुस्लीम लीग- नवाझ (पीएलएल-एन) पक्ष त्या खोलोखाल जागा जिंकून स्पर्धेत दुसरे स्थान मिळवून होता. बिलावल भुट्टो यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीला (पीपीपी) तिसऱ्या क्रमांकाच्या जागा मिळाल्या होत्या. पाकिस्तान निवडणूक आयोगाकडून अद्याप सर्व जागांचे निकाल अधिकृतपणे जाहीर करण्यात आले नव्हते. मात्र, इम्रान खान आणि नवाझ शरीफ या दोघांच्याही पक्षांनी बहुमताचा, तसेच गैरव्यवहारांचा दावा केला होता.

पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीत (संसद) एकूण ३३६ जागा आहेत. त्यापैकी २६६ जागांसाठी गुरुवारी मतदान पार पडले. उर्वरीत जागा महिला आणि अल्पसंख्याकांसाठी राखीव असून सार्वत्रिक निवडणुकीत मिळालेल्या मतांच्या टक्केवारीनुसार त्या सर्व राजकीय पक्षांना वाटून देण्यात येतील. स्पष्ट बहुमतासाठी कोणत्याही पक्षाला ३३६ पैकी १६९ किंवा २६६ पैकी १३३ जागांवर विजय मिळवणे आवश्यक आहे. शुक्रवारी सायंकाळपर्यंत निवडणूक आयोगाकडून १३९ जागांचे निकाल जाहीर करण्यात आले होते. त्यात ५५ जागांवर अपक्ष उमेदवार निवडून आले होते. त्यापैकी बहुतांश अपक्ष उमेदवारांना इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षाने पाठिंबा जाहीर केला आहे. शरीफ यांच्या पीएमएल (एन) पक्षाला ४३ आणि भुट्टो यांच्या पीपीपीला ३५ जागा मिळाल्या होत्या. रात्री उशीरापर्यंत मतमोजणी सुरू होती.

मोबाईल, इंटरनेट बंदीमुळे वाद

इम्रान खान स्वत: तुरुंगात असल्याने निवडणूक लढवण्यास अपात्र होते. त्यांच्या पक्षाचे बॅट हे चिन्ह गोठवले होते. त्यामुळे त्यांनी बरेच उमेदवार बाहेरून पाठिंबा देऊन अपक्ष म्हणून रिंगणात उतरवले होते आणि त्यांची चिन्हांसह यादी एका वेबसाईटवर दिली होती. मात्र, इंटरनेट बंद असल्याने मतदार ती वेबसाईट पाहू शकले नाहीत. शुक्रवारी निवडणूक आयोगाचे निकाल जाहीर करणारे ॲपही व्यवस्थित चालत नसल्याने अडचणी आल्या.

logo
marathi.freepressjournal.in