जनमताचा कौल रात्रीच्या अंधारात हिसकावला - पीटीआय

पाकिस्तानात नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत इम्रान खान यांचा पक्ष पाकिस्तान तेहरिक ए - इन्साफ सर्वात मोठा विजयी पक्ष ठरला होता. मात्र,
जनमताचा कौल रात्रीच्या अंधारात हिसकावला - पीटीआय
Published on

लाहोर : पाकिस्तानात नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत इम्रान खान यांचा पक्ष पाकिस्तान तेहरिक ए - इन्साफ सर्वात मोठा विजयी पक्ष ठरला होता. मात्र, नवाझ शरीफ यांच्या नेतृत्वाखालील पीएमएल-एन यांच्या पक्षाला अन्य पक्षांनी पाठिंबा दिल्याने इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षाचे केंद्रीय माहिती सचिव रौफ हसन यांची सरकार स्थापन करण्याची संधी हुकली आहे. यामुळे निराश झालेल्या रौफ हसन यांनी जनमताचा कौल रात्रीच्या अंधारात हिसकावला गेला असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

मंगळवारी रात्री पाकिस्तानी मुस्लीम लीग-नवाझ पक्षाने पक्षाचे सर्वेसर्वा आणि तीन वेळचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना वगळून ७२ वर्षीय शाहबाज यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित केले. एक्सवरील पोस्टच्या माध्यमातून रौफ हसन म्हणतात की, पाकिस्तानला आता आणखी वाताहात होण्याच्या मार्गावर आणण्यात आले आहे. पीएमएल-एन युतीचे सरकार म्हणजे गुन्हेगारांना सरकार स्थापन करण्यास निमंत्रित करण्यासारखे आहे. त्यांना जनतेने नाकारले आहे. यातून देशासमोर कोणत्या समस्या वाढून ठेवल्या आहेत, याचा अंदाज येतो, असे रौफ हसन यांनी म्हटले आहे.

इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षाचा पाठिंबा लाभलेले अपक्ष उमेदवार मोठ्या प्रमाणात मते घेऊन विजयी झाले आहेत. २६६ सदस्यांच्या संसदेत इम्रान खान यांच्या पक्षाचा पाठिंबा असलेले तब्बल ९२ अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. सरकार स्थापन करण्यासाठी तेथे १३३ बहुमताची गरज आहे. तेथे २६६ पैकी २६५ जागांवर निवडणूक झाली आहे. ७१ वर्षांचे माजी क्रिकेटर इम्रान खान सध्या तुरुंगात आहेत. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप करण्यात आले आहेत. पीटीआय पक्षाने वटवाघूळ हे निवडणूक चिन्ह गमावल्यामुळे सर्व उमेदवारांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढली होती. दुर्दैवाने लोकशाही मूल्यांवर आघात करण्यात आला असून राष्ट्रभावना आणि राष्ट्रहिताकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे, असेही रौफ हसन यांनी म्हटले आहे. तेव्हा आता काळ्या शक्तींना रोखून जनतेने निवडून दिलेल्यांच्या हाती सत्तेची कमान सोपवली पाहिजे, अशी मागणी देखील हसन यांनी केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in