
पाकिस्तानी रुपयाचे मूल्य डॉलर्सच्या तुलनेत आतापर्यंतच्या सर्वात नीचांकी स्तरावर येऊन पोहोचले आहे. एका डॉलर्ससाठी पाकिस्तानला १८८.३५ रुपये मोजावे लागत आहेत. श्रीलंकेप्रमाणे पाकिस्तानच्या चलनाचे मूल्य डॉलर्सच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात घसरले आहे. बुधवारी सकाळी ८२ पैशांनी पाकिस्तानी रुपया डॉलर्सच्या तुलनेत घसरला.
पाकिस्तानमधील अस्थिर राजकीय परिस्थिती, ढासळलेली अर्थव्यवस्था, महागाई, इंधनाच्या वाढत्या किमती यामुळे पाकिस्तानची आर्थिक घडी पार विस्कटली आहे. त्यामुळे पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे मदत मागितली. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनेही सहा अब्ज डॉलर्स देण्याची तयारी दर्शवली होती. यासाठी काही प्रमाणात आर्थिक शिस्त पाळण्याच्या सूचना त्यांनी पाकिस्तानला केल्या होत्या. विशेषतः इंधन आणि विजेवर असलेली सवलत मोठ्या प्रमाणात कमी करावी, असे नाणेनिधीने स्पष्टपणे पाकिस्तानला बजावले होते. दरम्यान, पाकिस्तानमध्ये सत्तांतर झाल्यावरही हे बदल होऊ शकले नाहीत. यामुळे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनेही पाकिस्तानला अपेक्षित असलेला अर्थपुरवठा थांबवला आहे. यामुळे पाकिस्तानच्या अडचणीत भर पडली आहे.
पाकिस्तानमधील विदेशी चलनसाठाही कमी झाला असून पुढील अवघे काही दिवस काढता येतील, अशी परिस्थिती आहे. त्यात आता अन्नधान्याचे संकटही पाकिस्तानसमोर उभे ठाकले आहे. गव्हाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात यावर्षी कमी झाल्याने त्यात भर पडली आहे.