शिवरायांच्या पुतळ्याचे मॉरिशसमध्ये लोकार्पण; उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत होणार सोहळा

महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे येत्या शुक्रवारी २८ एप्रिलला मॉरिशसमध्ये लोकार्पण होईल.
शिवरायांच्या पुतळ्याचे मॉरिशसमध्ये लोकार्पण; उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत होणार सोहळा

महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे येत्या शुक्रवारी २८ एप्रिलला मॉरिशसमध्ये लोकार्पण होईल. मॉरिशसचे पंतप्रधान प्रवींद्रकुमार जगन्नाथ आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.

मॉरिशसमध्ये सुमारे ७५ हजार मराठी बांधव असून ते पुणे, सातारा, रत्नागिरी आणि कोकण भागातील आहेत. त्यांनी आपल्या मराठी परंपरा, संस्कृती जोपासली आहे. या मराठी बांधवांच्या ५४ संघटना असून, या सर्व संघटनांचा मिळून मॉरिशस मराठी मंडळी फेडरेशन स्थापन करण्यात आला आहे. मॉरिशसमध्ये शिवजयंती, महाराष्ट्र दिन, गुढीपाडवा, गणेश चतुर्थी मोठ्या उत्साहात येथे साजरे होतात.

मॉरिशसमध्ये एक महाराष्ट्र भवन उभारण्यात आले असून, त्याच्या विस्तारासंदर्भातील सुद्धा काही मागण्या आहेत. या दौऱ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून त्यादृष्टीने काही महत्त्वपूर्ण घोषणा अपेक्षित आहेत. महाराष्ट्र भवनच्या टप्पा-२ साठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ८ कोटी रुपये देण्यास मान्यता दिली आहे. मॉरिशसचे परराष्ट्र व्यवहार मंत्री ए. गानू यांनी ८ मार्च २०२३ रोजी फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या लोकार्पणासाठी तसेच महाराष्ट्र भवनाच्या पुढील विस्तारासंबंधी आपला मनोदय व्यक्त केला होता.

या दौऱ्यात मॉरिशस-इंडिया बिझनेस कम्युनिटीसोबत सुद्धा देवेंद्र फडणवीस हे भेटणार असून, काही सामंजस्य करारावर सुद्धा स्वाक्षरी होणार आहेत. या दौऱ्यात पर्यटन आणि उद्योग क्षेत्रात महत्त्वाचे करार अपेक्षित आहेत. मॉरिशसचे राष्ट्राध्यक्ष पृथ्वीराजसिंग रुपून यांना सुद्धा देवेंद्र फडणवीस हे भेटणार आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in