तिस्ता नदी संवर्धन, व्यवस्थापनावर सहमती; नरेंद्र मोदी-शेख हसीना यांच्यात चर्चा

भारत आणि बांगलादेश यांनी व्यापक आर्थिक भागीदारी करार करण्याबाबत चर्चा सुरू करण्याचे शनिवारी मान्य केले.
तिस्ता नदी संवर्धन, व्यवस्थापनावर सहमती; नरेंद्र मोदी-शेख हसीना यांच्यात चर्चा
@MEAIndia/ Twitter

नवी दिल्ली : भारत आणि बांगलादेश यांनी व्यापक आर्थिक भागीदारी करार करण्याबाबत चर्चा सुरू करण्याचे शनिवारी मान्य केले. त्याचबरोबर दोन्ही देशांमधील सर्वंकष संबंधांना चालना देण्यासाठी भविष्यवादी दृष्टिकोन आखण्यासही दोन्ही देशांनी मान्यता दिली. भारत दौऱ्यावर आलेल्या बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्याशी चर्चा केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी ही माहिती दिली. तिस्ता नदीचे संवर्धन आणि व्यवस्थापन या मेगाप्रकल्पासाठी भारत बांगलादेशात लवकरच एक तांत्रिक तज्ज्ञांचा एक चमूही पाठिवणार आहे. दोन्ही देशांनी ते मान्य केले आहे.

बांगलादेश हा भारतासमवेत विकासाच्या क्षेत्रातील सर्वात मोठा भागीदार देश आहे आणि भारताचेही बांगलादेशसमवेतच्या संबंधांना सर्वोच्च प्राधान्य आहे, असेही मोदी म्हणाले. भारत आणि बांगलादेश यांच्यात नव्या क्षेत्रातील सहकार्याबाबतचा भविष्यवादी दृष्टिकोन तयार करण्यात आला आहे, असेही मोदी यांनी हसिना यांच्या उपस्थितीत सांगितले.

दोन्ही देशांमधील संबंध अधिक व्यापक करण्यासाठी डिजिटल, सागरी क्षेत्र आणि रेल्वे संपर्कता याबाबतचे करार करण्यात आले. हरित भागीदारीबाबतचाही करार करण्यात आला. द्विपक्षीय आर्थिक संबंध पुढे नेण्यासाठी व्यापक आर्थिक भागीदारी कराराबाबत चर्चा करण्याचे मान्य करण्यात आले. संरक्षण उत्पादन आणि सशस्त्र दलांचे आधुनिकीकरण यासह संरक्षण क्षेत्रातील सहकार्याबाबतही चर्चा करण्यात आली, असे मोदी म्हणाले.

भारत हा बांगलादेशचा मोठा शेजारी आणि विश्वासू मित्र आहे. बांगलादेश भारतासमवेत असलेल्या संबंधांचे मूल्य जाणतो, असे यावेळी शेख हसीना म्हणाल्या. डिजिटल, हरित भागीदारी, रेल्वे संपर्कता, ब्ल्यू इकॉनॉमी याबाबत दोन्ही देशांमध्ये करार करण्यात आले आणि सुरक्षा, व्यापार, नदी पाणीवाटप, ऊर्जा, प्रादेशिक सहकार्य आदी विषयांवर व्यापक चर्चा झाल्याचे हसीना म्हणाल्या.

logo
marathi.freepressjournal.in