
तियानजीन : भारत आणि चीन हे एकमेकांचे विरोधक नसून विकासाचे भागीदार आहेत. दोन्ही देशातील मतभेदांचे रुपांतर वादांमध्ये होऊ नये, असे भारतीय परराष्ट्र खात्याने सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शांघार्य सहकार्य संघटनेच्या शिखर संमेलनापूर्वी चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांना भेटले. सात वर्षानंतर चीनच्या दौऱ्यावर पोहचलेल्या मोदी यांनी जिनपिंग यांच्यासोबत ५० मिनीटे चर्चा केली.
मोदी यांनी जिनपिंग यांच्यासमोर दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला. दहशतवाद हा जागतिक असून त्याचा निपटारा करायला समर्थन देण्याची मागणी मोदी यांनी केली.
तर जिनपिंग म्हणाले की, मोदी यांच्याशी भेटून आनंद झाला. ड्रॅगन (चीन) व हत्ती (भारत) यांना आता एकत्र आले पाहिजे.
या परिषदेनंतर मोदी यांनी नेपाळचे पंतप्रधान के. पी. ओली, मालदीवचे राष्ट्रपति मुइज्जू यांच्यासह अन्य देशांशी चर्चा केली.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धमक्यांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीवर जगाचे लक्ष होते. दोन्ही नेत्यांनी भारत-चीन सीमावादाचा "न्याय्य, योग्य आणि परस्पर मान्य" तोडगा काढण्यासाठी काम करण्याचे मान्य केले आणि जागतिक व्यापार स्थिर ठेवण्यात दोन्ही अर्थव्यवस्थांची भूमिका ओळखून व्यापार व गुंतवणूक संबंध वाढविण्याचा निर्धार केला.
या विस्तृत चर्चेत दोन्ही नेत्यांनी प्रामुख्याने व्यापार व गुंतवणूक संबंध मजबूत करण्यावर भर दिला. हे पाऊल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवर तब्बल ५० टक्क्यांपर्यंत शुल्कासह लादलेल्या निर्बंधांमुळे जागतिक व्यापारात झालेल्या अडथळ्यांच्या पार्श्वभूमीवर आले.
जिनपिंग यांना भारतभेटीचे निमंत्रण
मोदींनी शांघार्य सहकार्य परिषदेच्या अध्यक्षपदासाठी चीनच्या समर्थनाचे स्वागत केले व २०२६ मधील ‘ब्रीक्स’ शिखर परिषदेचे अध्यक्षपद भारताकडे असताना शी यांना निमंत्रण दिले. शी यांनी या निमंत्रणाबद्दल आभार मानले व ‘ब्रीक्स’च्या अध्यक्षपदाला समर्थन देण्याचे आश्वासन दिले.
मोदी यांनी चीनच्या कम्युनिस्ट पार्टीच्या पॉलिटब्युरोच्या स्थायी समितीचे सदस्य काई ची यांचीही भेट घेतली.