नवी दिल्ल : भारत आणि चीनमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील दोन्ही देशांच्या सैनिकांची माघारीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. दोन्ही देशांचे सैन्य आता आपल्या जागेतील चौक्या हटवण्याचे काम करत आहेत, असे सूत्रांनी सांगितले.
२१ ऑक्टोबर रोजी भारताने पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गस्तीबाबत चीनसोबत एका कराराची घोषणा केली. त्यामुळे चार वर्षांपासून सुरू असलेला संघर्ष संपुष्टात आला आहे.
संरक्षण क्षेत्रातील सूत्रांच्या माहितीनुसार, भारत व चिनी सैनिकांची माघारीची प्रक्रिया ९० टक्के पूर्ण झाली आहे. आता दोन्ही देशांच्या चौक्या हटवण्याचे काम सुरू आहे. ही प्रक्रिया मंगळवारपर्यंत पूर्ण होईल.
आता दोन्ही देशांची गस्त सुरू होणार
२९ ऑक्टोबरपर्यंत देपसांग व देमचोक येथून सैन्य माघारी घेण्याचे लक्ष्य भारतीय लष्कराने ठेवले होते. त्यानंतर आता दोन्ही देशांची गस्त सुरू होईल. अनेक वर्षांपासून सुरू असलेला वाद सोडवण्याच्या दृष्टीने भारत प्रयत्न करत आहे. त्यामुळे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर एप्रिल २०२० पूर्वीची स्थिती निर्माण होऊ शकेल, असे सूत्रांनी सांगितले.