
नवी दिल्ली : भारत-चीनदरम्यान चर्चा व कुटनीतीद्वारे सीमावाद सोडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. दोन्ही देशातील संबंध किंचित सुधारले आहेत, असे प्रतिपादन परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सांगितले.
संसदेत भारत-चीन संबंधाबाबत माहिती देताना जयशंकर म्हणाले की, दोन्ही देशांच्या संबंधांत सुधारणा होत आहे. सैन्य व कुटनीती चर्चेद्वारे सीमावाद सोडवण्यात आला आहे. त्यात ऑक्टोबरमधील नियंत्रणरेषेवरील गस्तीबाबतच्या कराराचा समावेश आहे. २०२० पासून सीमाभागात चीनच्या कारवायांमुळे शांततेचा भंग झाला होता. तेव्हापासून भारत-चीन संबंध सामान्य राहिलेले नाहीत. कोविड महासाथ व लॉजिस्टीकचे आव्हान असतानाही भारतीय सैन्य दलाने चिनी सैनिकांचा तत्काळ मुकाबला केला, असे जयशंकर यांनी सांगितले.
ते म्हणाले की, नुकत्याच झालेल्या कुटनीती चर्चेमुळे भारत-चीनच्या संबंधांमध्ये सुधारणा झाली. भारत सरकार नि:पक्षपाती व स्वीकारार्ह सीमेबाबत तोडगा काढण्याच्या दिशेने काम करत आहे. येत्या काही दिवसांत आम्ही सीमावर्ती भागात तणाव कमी करण्यासाठी व कारवायांवर प्रभावी ठरणाऱ्या व्यवस्थापनाबाबत चर्चा करेल. सैन्य सीमेवरून परतल्याचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर आम्ही द्विपक्षीय संबंधांच्या अन्य मुद्द्यावर लक्ष केंद्रित करू शकू, असे ते म्हणाले.
चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यासोबत चर्चा करताना विशेष प्रतिनिधी व परराष्ट्र सचिव स्तरावरील बोलणी लवकरच करण्यासाठी दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे. सीमेचे व्यवस्थापन करताना मागील अनुभव लक्षात घेऊन अधिक लक्ष पुरवण्याची गरज आहे, असे जयशंकर यांनी सांगितले.
भारत-चीन संबंधांवर नकारात्मक परिणाम
सीमेवर सातत्याने तणाव निर्माण होत असल्याने भारत-चीन संबंधांवर नकारात्मक परिणाम पडला. प्राथमिक टप्प्यात संघर्षाच्या जागांवरून सैनिकांना हटवण्याची प्रक्रिया पूर्ण केली. सीमेवर सैन्याची संख्या कमी करण्याचे आणि तणाव संपवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील, असे जयशंकर यांनी सांगितले.