नवी दिल्ली : पूर्व लडाखमध्ये भारत-चीन सीमेवर भारतीय लष्कराने शुक्रवारपासून गस्त सुरू केली आहे. देमचोकहून गस्त सुरू झाली असून देपसांग येथे लवकरच गस्त सुरू होणार आहे. देमचोक व देपसांग येथून दोन्ही देशांच्या सैन्याने माघार घेण्यासाठी सहमती दर्शवली होती. सैन्य माघारीची ही प्रक्रिया ३० ऑक्टोबरला पूर्ण झाली.
दिवाळीनिमित्त गुरुवारी पूर्व लडाखमधील हॉट स्प्रिंग्स, काराकोरम खिंड, दौलत बेग ओल्डी, कोंग्कला आणि चुशुल-मोल्डोला लागून असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवर दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांना मिठाई भेट दिली व दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. संसदीय कार्य मंत्री आणि अल्पसंख्यांक मंत्री किरेन रिजिजू यांनी अरुणाचल प्रदेशजवळच्या बुमला खिंड भागात चिनी सैनिकांशी गप्पा मारल्या.
भारत-चीन दरम्यानच्या प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवर गस्तीबाबत झालेल्या करारावरून परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी २७ ऑक्टोबरला सांगितले की, सैन्याची माघारी हे पहिले पाऊल आहे. पुढील पाऊल हे तणाव कमी करणे आहे. मात्र, तणाव कमी करण्याची इच्छा चीनचीही असली पाहिजे, तर तो कमी होऊ शकेल. तणाव कमी झाल्यानंतर सीमेचे व्यवस्थापन कसे केले जावे यावर चर्चा होईल.
चार वर्षांनंतर तणाव निवळला
भारत-चीनदरम्यान पूर्व लडाख भागात चार वर्षे सीमावादावरून तणाव होता. दोन वर्षांच्या चर्चेनंतर दोन्ही देशांचे सैन्य वादग्रस्त देपसांग व देमचोक पॉइंटवरून मागे हटण्याबाबत करार झाला.