जगातील १५ पैकी १२ उष्ण शहरे भारतात सर्वाधिक पावसाची ६ शहरेही भारतीयच

जगातील १५ पैकी १२ उष्ण शहरे भारतात
सर्वाधिक पावसाची ६ शहरेही भारतीयच
Published on

भारतात गेले काही दिवस विक्रमी तापमानाची नोंद होत आहे. रविवारी जगातील १५ शहरांमध्ये ४७ डिग्री सेल्सियसहून अधिक तापमान होते. यातील १२ शहरे भारत व ३ शहरे पाकिस्तानातील होती. दुसरीकडे जगात ज्या १५ शहरांत रविवारी १०० मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला, त्यातही ६ शहरे ही भारतातील होती.

भारतात रविवारी सर्वाधिक ४९ अंश सेल्सियस तापमान उत्तर प्रदेशातील बांदामध्ये नोंद झाले. पाकमधील डेरा इस्माइल खां दुसरे सर्वात उष्ण शहर ठरले. तर देशात गेल्या २४ तासांत सर्वाधिक २२० मिमी पावसाची नोंद केरळमधील कोची येथे झाली. ते जगात चौथ्या स्थानी राहिले. सर्वाधिक २६४ मिमी पाऊस कॅनडातील कारमान शहरात नोंदवला गेला. तथापि, हवामान विभागाच्या मते आसाम-मेघालयातील जोबाईमध्ये २९० मिमी, चेरापुंजीत २२० मिमी पावसाची नोंद झाली; पण ही ठिकाणे जागतिक यादीत समाविष्ट नाहीत.

पूर्वेकडे सरासरीपेक्षा जास्त पाऊस होत आहे. आसाम आणि मेघालयातील अनेक जिल्ह्यांत १०० मिमीहून अधिक पावसाची नोंद झाली. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आता त्यात वाढ होऊन ओडिशा,बिहार, झारखंड, प.बंगालसह छत्तीसगडमधील काही जिल्ह्यांत पुढील पाच दिवसांत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल.

logo
marathi.freepressjournal.in