

वॉशिंग्टन : अमेरिका पाकिस्तानसोबत सामरिक संबंध वाढवू इच्छित आहे, परंतु हे भारताशी असलेल्या ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण संबंधांची किंमत मोजून होणार नाही, असे अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांनी म्हटले आहे.
क्वालांलपूर येथे होणाऱ्या परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यासोबतच्या बैठकीपूर्वी रुबियो यांनी भारत-रशिया ऊर्जा संबंधांचा उल्लेख करताना सांगितले की, भारताने आधीच आपल्या कच्च्या तेलाचा पुरवठ्याचे विविधीकरण करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
रुबियो हे ‘आसियान’ शिखर परिषदेच्या निमित्ताने मलेशिया दौऱ्यापूर्वी पत्रकारांशी संवाद साधत होते.
अमेरिका-पाकिस्तान संबंधांवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना रुबियो म्हणाले, भारताची चिंता नैसर्गिक आहे, पण अमेरिकेचे पाकसोबतचे संबंध हे नवी दिल्लीसोबतच्या संबंधांच्या आड येणार नाहीत.
भारत तेल पुरवठ्याचे विविधीकरण करतोय!
“जर त्यांनी आपले तेल खरेदीचे पर्याय विविध केले, तर आमच्याकडून, काही इतरांकडून ते खरेदी करतील. पण मी सध्या कोणत्याही व्यापार करारावर बोलणी करत नाही, त्यामुळे यावर मी तर्क करणार नाही. पण मला माहित आहे की त्यांनी (भारताने) हे विषय सुरू होण्याच्या आधीच तेल पुरवठ्याचे विविधीकरण करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे अर्थातच, आम्ही जितके जास्त त्यांना विकू, तितके ते इतरांकडून कमी खरेदी करतील. पण पाहू या, शेवटी ते कुठे पोहोचतात,” असे रुबियो म्हणाले.
गेल्या सहा महिन्यांत अमेरिका-पाकिस्तान संबंधांमध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे. विशेषतः मे महिन्यात भारत आणि पाकिस्तानदरम्यान झालेल्या लष्करी संघर्षानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानचे सैन्यप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांची भेट घेतल्यानंतर अमेरिका-पाक संबंध सुधारल्याची चिन्हे दिसत आहेत.
ट्रम्प यांनी दोन्ही देशांमध्ये युद्धविराम घडवून आणल्याच्या दाव्यांना भारताने जरी नाकारले असले, तरी पाकिस्तानने संघर्ष थांबवण्यासाठी ट्रम्प यांना श्रेय दिले. त्यामुळे ट्रम्प हे पाकिस्तानला सध्या झुकते माप देत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
परराष्ट्र धोरणाबाबत भारत परिपक्व
ते पुढे म्हणाले, ‘मला वाटते भारत याबाबतीत परिपक्व आहे. आम्हालाही अनेक देशांशी संबंध ठेवावे लागतात. आम्हाला पाकिस्तानसोबत सामरिक संबंध वाढवायचे आहेत. तसेच भारताशी असलेले दृढ संबंधही जपायचे आहेत. मला वाटते, भारत परराष्ट्र धोरणाच्या बाबतीत खूपच परिपक्व आणि व्यवहार्य आहे. जसे, त्यांचे काही देशांशी संबंध आहेत, ज्यांच्याशी आमचे नाहीत. हे सर्व एका व्यवहार्य आणि परिपक्व राजनैतिक धोरणाचा भाग आहे,’ असे रुबियो म्हणाले.