

ऑकलंड : भारत आणि न्यूझीलंडने धोरणात्मक भागीदारी केली असून २०३० पर्यंत आपला वार्षिक द्विपक्षीय व्यापार दुप्पट करून ३५ हजार कोटी रुपयांवर नेण्याचे लक्ष्य ठेवले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी १८ मुद्यांवर चर्चा केली. त्यात १० करारांचा समावेश आहे. यात एकूण संबंधांचा विस्तार करण्यासाठी चार वर्षांचा कृती आराखडा आणि त्यासोबतच हायड्रोग्राफिक डेटा शेअरिंग वाढवणे, परस्पर नौदल लॉजिस्टिक सुलभ करणे आणि इंडो-पॅसिफिकमधील वाढत्या सागरी सहभागाची चौकट आखणे या उद्देशाने केलेले तीन महत्त्वपूर्ण करार प्रमुख होते.
दोन्ही देशांनी दहशतवादविरोधी संयुक्त कार्यगटाव्यतिरिक्त सागरी सुरक्षा संवाद, क्रीडा क्षेत्राबाबत भारत-न्यूझीलंड संयुक्त कृती योजनेलाही अंतिम रूप देण्यात आले.
मोदींना जनतेशी थेट संवाद साधण्याची कला अवगत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी थेट संवाद साधण्याच्या कलेत नैपुण्य मिळवले आहे. कोणा मध्यस्थांमार्फत बोलणे त्यांना आवडत नाही, असे उत्तर भारतीय राजनैतिक अधिकारी रुद्रेद्र टंडन यांनी दिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे न्यूझीलंडमध्ये असताना भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांसोबत झालेल्या संवादादरम्यान न्यूझीलंडच्या एका पत्रकाराने प्रश्न विचारला की, 'पंतप्रधान मोदी पत्रकार परिषद का घेत नाहीत?' यावर परराष्ट्र मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी आणि राजनैतिक अधिकारी रुद्रेद्र टंडन यांनी पंतप्रधान मोदींच्या संवाद साधण्याच्या पद्धतीबाबत सविस्तर खुलासा केला.