
नवी दिल्लीः भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानच्या विमानांसाठी आपले हवाईक्षेत्र बंद ठेवण्याची मुदत वाढवून ती २४ सप्टेंबरपर्यंत केली आहे. पाकिस्ताननेही भारतीय विमानांसाठी हवाईक्षेत्र बंदीची मुदत २४ सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे.
दोन्ही देशांनी स्वतंत्र 'नोटिस टू एअरमेन' जारी करून या बंदीच्या कालावधीची माहिती दिली आहे.
२२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा बळी गेल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या विमान कंपन्या यांच्या मालकीची, चालवलेली किंवा भाडेतत्वावरील विमाने ३० एप्रिलपासून भारतीय हवाईक्षेत्रात येण्यास बंदी घातली होती. तेव्हापासून भारत ही बंदी सातत्याने वाढवत आहे.
२२ ऑगस्ट रोजी जारी केलेल्या 'नोटाम' नुसार पाकिस्तानमध्ये नोंदणीकृत विमाने तसेच पाकिस्तानच्या विमान कंपन्याकडून चालवली जाणारी, मालकीची किंवा भाड्याने घेतलेली विमाने (लष्करी उड्डाणांसह) भारतीय हवाईक्षेत्र वापरू शकणार नाहीत.
ही बंदी २३ सप्टेंबर रोजी रात्री ११.५९ पर्यंत म्हणजे भारतीय वेळेनुसार २४ सप्टेंबर रोजी सकाळी ५:३० वाजेपर्यंत लागू राहील.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने आहे. उचललेल्या पाकिस्तानविरुद्ध विविध उपाययोजनांचा हा भाग आहे.
सुरुवातीला ही बंदी २४ मेपर्यंत लागू होती; त्यानंतर दर महिन्याला तिचा कालावधी वाढवण्यात आला. २४ ऑगस्टपर्यंत असलेली बंदी २४ सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे. पाकिस्ताननेही २० ऑगस्ट रोजी जारी केलेल्या 'नोटाम' मधून भारतीय विमानांसाठी हवाईक्षेत्र बंद ठेवण्याची मुदत वाढवली होती.