पाकिस्तानचा थयथयाट! पाणी रोखणे ‘युद्धाला चिथावणी’ देण्यासारखे; भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केले बंद

पहलगाममधील भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने आक्रमक भूमिका घेत पाकिस्तानची कोंडी करणारे कठोर निर्णय घेतल्याने पाकिस्तानने गुरुवारी थयथयाट केला.
पाकिस्तानचा थयथयाट! पाणी रोखणे ‘युद्धाला चिथावणी’ देण्यासारखे; भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केले बंद
एक्स @AdityaRajKaul
Published on

इस्लामाबाद : पहलगाममधील भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने आक्रमक भूमिका घेत पाकिस्तानची कोंडी करणारे कठोर निर्णय घेतल्याने पाकिस्तानने गुरुवारी थयथयाट केला. भारताने सिंधू कराराला स्थगिती दिली हा युद्धाला चिथावणी देण्याचा प्रकार असल्याचा कांगावा पाकने केला. पाकिस्तानने गुरुवारी राष्ट्रीय सुरक्षा समितीची (एनएससी) तातडीची बैठक बोलावून काही महत्त्वाचे निर्णय जाहीर केले. त्यामध्ये भारतासाठी हवाई क्षेत्र बंदी आणि व्यापार स्थगित करण्याची घोषणा केली. तसेच सर्व द्विपक्षीय करार स्थगित करण्याचे संकेतही दिले आहेत.

भारताने राजनैतिक कोंडी केल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक घेतली. पंतप्रधानांच्यावतीने जाहीर करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले की, सिंधू जल करार स्थगित करण्याच्या भारताच्या निर्णयाचा आम्ही तीव्र शब्दात विरोध करतो. सिंधू जल करारानुसार पाकिस्तानात वाहणाऱ्या पाण्याचा प्रवाह रोखणे किंवा वळविण्याचा प्रयत्न करणे हे युद्धाला चिथावणी दिल्याचे कृत्य समजले जाईल.

सिमला कराराचा उल्लेख

इस्लामाबाद येथे गुरुवारी पाकिस्तानच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची आणि मंत्री गटाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर भारताबरोबर झालेले सर्व द्विपक्षीय करार स्थगित करण्याचा अधिकार पाकिस्तान वापरू शकतो, असे पाकिस्तानने म्हटले आहे. यात सिमला कराराचाही उल्लेख करण्यात आला आहे.

भारतीयांचा व्हिसा स्थगित

भारताने सिंधू नदीचे पाणी रोखल्याने पाकिस्तानची शेती करपून जाणार आहे. तसेच प्रचंड दुष्काळ पडणार आहे. यामुळे आधीच भिकेला लागलेल्या पाकिस्तानची आर्थिक अवस्था अधिकच भीषण होणार आहे. यावरून पाकिस्तानने भारताच्या या निर्णयांना कसे तोंड द्यायचे यासाठी ‘एनएससी’ची बैठक बोलावली होती. या बैठकीत पाकिस्तानने काही निर्णय घेतले आहेत. त्यात पाकने वाघा सीमा बंद केली आहे. तसेच तिसऱ्या देशातून होणाऱ्या व्यापारासह सर्व प्रकारच्या व्यापारावर बंदीची घोषणा केली आहे. त्याचप्रमाणे सार्क व्हिसा योजनेंतर्गत शीख यात्रेकरू वगळता अन्य भारतीयांचा व्हिसा स्थगित केला आहे.

पाकिस्तानला पुरावे हवेत

पाकिस्तानच्या एनएससी बैठकीत भारताने अद्याप दहशतवादी हल्ल्याचे पुरावे पाकिस्तानला दिलेले नाहीत, असे म्हटले आहे. तसेच पाणी रोखणे म्हणजे युद्धासारखीच कारवाई असल्याचा आरोप केला आहे. भारत हवाई हल्ला करू शकतो. यामुळे भारतीय प्रवासी विमानांना ये-जा करण्यासाठी हवाई क्षेत्र बंद केले आहे. याचबरोबर पाकिस्तानने भारतासोबतच्या सर्व व्यापारांवर बंदी घातली आहे.

इस्लामाबादेत भारतीय उच्चायुक्त कार्यालयाबाहेर गोंधळ

एनएससीच्या बैठकीनंतर काही वेळातच, पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालयाबाहेर जमावाने गोंधळ घातला, काही लोकांनी गेटवरून उडी मारण्याचा प्रयत्न केला आणि भारतविरोधी घोषणा दिल्या. दरम्यान, पाकिस्तानने भारतीय उच्चायुक्तालयाबाहेरील सुरक्षा जाणूनबुजून काढून टाकल्याचा आरोप केला जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in