Pahalgam terror attack : काहीतरी मोठे घडणार! रशियन माध्यमांचा दावा

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानवर कायदेशीर स्ट्राइक केला असतानाच, आता पाकिस्ताननेही भारताला जशास तसे प्रत्युत्तर देण्याची तयारी केली आहे.
Pahalgam terror attack : काहीतरी मोठे घडणार! रशियन माध्यमांचा दावा
Published on

नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानवर कायदेशीर स्ट्राइक केला असतानाच, आता पाकिस्ताननेही भारताला जशास तसे प्रत्युत्तर देण्याची तयारी केली आहे. भारताने पाकिस्तानसोबतचे राजकीय संबंध तोडले असून आता लष्करी पातळीवरही प्रत्युत्तर देण्याची तयारी केली आहे. त्यातच, काहीतरी मोठे घडणार, असा इशारा रशियन माध्यमांनी दिला आहे.

रशियन माध्यमांच्या वृत्तानुसार, “दोन्ही अण्वस्त्रसंपन्न देशांमधील परिस्थिती वेगाने बिघडत आहे. त्यामुळे ‘काहीतरी मोठे घडू शकते’. हा इशारा केवळ प्रादेशिकच नाही तर जागतिक सुरक्षेच्या दृष्टिकोनातूनही गंभीर मानला जात आहे. यामुळे भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा लष्करी संघर्षाकडे वाटचाल करत आहेत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.”

“भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांकडून ज्या पद्धतीने वक्तव्य केली जात आहेत, लष्करी हालचाली वाढल्या आहेत, ते पाहिल्यावर परिस्थिती संवेदनशील झाल्याचे दिसत आहे. दक्षिण आशिया एका युद्धाकडे लोटला जात असल्याचे दिसत आहे. दोन्ही देशांमध्ये परिस्थिती तणावपूर्ण आहे. त्यामुळे एखादी अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही,” असे रशियन माध्यमांनी म्हटले आहे.

भारतीय हवाई दलाचा ‘आक्रमण’ सराव

पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवाई दलाने गुरुवारी ‘आक्रमण’ युद्धसराव केला. या सरावात विविध प्रकारच्या लढाऊ विमानांनी सहभाग घेतला. हा नियमित सराव होता, असे सूत्रांनी सांगितले. या सरावात राफेल, एसयू-३० एस आणि अन्य विमाने सहभागी झाली होती. भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढलेला असतानाच हा सराव करण्यात आला आहे.

भारताने परदेशी राजदूतांना दिली हल्ल्याची माहिती

अमेरिका, कॅनडा, जर्मनी, जपान, पोलंड, ब्रिटन आणि रशियासह अनेक देशांच्या राजदूतांना गुरुवारी दिल्लीतील साउथ ब्लॉक येथील परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयात बोलावण्यात आले होते. परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी या देशांच्या राजदूतांना दोन दिवसांपूर्वी झालेल्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याबाबतची सविस्तर माहिती दिली. पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या भूमिकेची माहिती या राजदूतांना देण्यात येत आहे.

भारताची समुद्रात क्षेपणास्त्राची चाचणी सुरू

पहलागमच्या घटनेनंतर भारताच्या कारवाईने घाबरलेल्या पाकिस्तानने ग्वादर बंदराजवळ क्षेपणास्त्र डागण्याचा सराव सुरू केल्यानंतर त्याला उत्तर म्हणून भारतानेही क्षेपणास्त्राची चाचणी केली आहे. भारतीय नौदलाने आयएनएस सुरतवरून यशस्वी चाचणी केली आहे. 'पाकिस्तानने २४-२५ एप्रिल रोजी त्यांच्या स्पेस इकॉनॉमी क्षेत्रातील कराची किनाऱ्याजवळ जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्याची अधिसूचना जारी केली आहे. या सर्व घडामोडींवर आता भारतीय यंत्रणांचे लक्ष असणार आहे. पाकिस्तानच्या क्षेपणास्त्राची मारक क्षमता ४८० किमी इतकी असणार आहे. यासाठी पाकिस्तानने अरबी समुद्र प्रदेशाला ‘नो-फ्लाय झोन’ म्हणून घोषित केले आहे.

त्यालाच प्रत्युत्तर म्हणून, आयएनएस सूरत या विनाशिकेवरुन भारताने मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. हे क्षेपणास्त्र ७० किमी. पर्यंतच्या लक्ष्याला अचूक हल्ला करुन नष्ट करण्यास सक्षम आहे. तसेच आयएनएस विक्रांत कर्नाटकातील नौदल तळावरून अरबी समुद्रात रवाना करण्यात आले आहे. आयएनएस विक्रांत रवाना होत असल्याचे फोटो उपग्रहांनी टिपले आहेत. आयएनएस विक्रांतवर मिग-२९के ही लढाऊ विमाने आणि हल्ला करणारे हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले आहेत.

अमित शहांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

पहलगाम येथील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी गुरुवारी संध्याकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. पहलगाम हल्ल्यानंतर तातडीने राष्ट्रपती भवनात बैठक आयोजित करण्यात आली होती. अमित शहा यांच्या हातात लाल रंगाची ‘गुप्त’ फाईल होती. पाकिस्तानविरुद्धची आक्रमक रणनीती असणाऱ्या या फाईलवर राष्ट्रपतींनी सही केली का? हे दोन्ही मंत्री राष्ट्रपतींकडे कशाची मंजुरी घेण्यासाठी गेले होते? हे प्रश्न सध्या चर्चेत आहेत.

अटारी सीमेवर पाकिस्तानी नागरिकांची गर्दी

दरम्यान, केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाच्या आदेशानुसार, अनेक पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडण्यास सुरुवात केली आहे. अटारी सीमेवर पाकिस्तानी नागरिकांनी गर्दी केली असून ते आपल्या मायदेशी जाण्यास निघाले आहेत. यामध्ये काही जण पर्यटक आहेत तर काहीजण वैद्यकीय किंवा इतर कारणांसाठी भारतात आले होते. त्यामुळे अटारी सीमेवर पाकिस्तानी नागरिकांनी गर्दी केली आहे. मात्र पाकिस्तान सरकारनेही अटारी सीमा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

भारताचे आरोप

पाकिस्तान दहशतवाद्यांना लाँचिंग पॅड, शस्त्रे उपलब्ध करून देत असल्याचा तसेच ‘आयएसआय’ या दहशतवाद्यांमागे असल्याचा आरोप भारताने केला आहे. पाकिस्तानविरोधात कारवाई करण्यासाठी सुरुवातीच्या टप्प्यात सिंधू नदीचे पाणी रोखण्यात आले आहे. तसेच पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांत देश सोडण्याचा आदेश दिला आहे. पाकिस्तानी राजदूतांनाही आठवड्याचा अवधी देण्यात आला आहे.

वैद्यकीय व्हिसा

दरम्यान, भारतीय परराष्ट्र खात्याने पाकिस्तानात असलेल्या भारतीयांना लवकरात लवकर मायदेशी येण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पाकिस्तानींनाही भारत सोडण्याचे आदेश दिले आहेत. २९ एप्रिलनंतर मेडिकल व्हिसादेखील कार्यरत राहणार नाही, असे सांगितले आहे. इतर प्रकारचे व्हिसा २७ एप्रिलपासूनच रद्द होणार आहेत.

लीलावती, अंबानींकडून मोफत उपचाराची घोषणा

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्यांसाठी मुंबईतील लीलावती हॉस्पीटल आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील ‘सर एच. एन. रिलायन्स हॉस्पिटल’मध्ये मोफत उपचार दिले जातील, अशी घोषणा करण्यात आली आहे. “या हल्ल्यात निष्पाप भारतीयांचे प्राण गेले असून त्यांच्याप्रती दु:ख व्यक्त करतो. तसेच जखमींना संपूर्ण आणि लवकर बरे होण्यासाठी आपल्या प्रार्थना सोबत आहेत. यासोबतच रिलायन्स फाउंडेशनच्या मुंबईतील ‘सर एच. एन. रिलायन्स हॉस्पिटल’मध्ये सर्व जखमींवर मोफत उपचार केले जातील,” अशी घोषणा मुकेश अंबानी यांनी केली.

हल्ल्याच्या निषेधार्थ ‘डोंबिवली बंद’

काश्मीरमध्ये पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ गुरुवारी ‘डोंबिवली बंद’ पाळण्यात आला. दुकाने बंद करण्यासाठी हजारो महिला, पुरुष, भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. यावेळी दहशतवादी आणि पाकिस्तानचा निषेध करीत पाकविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

logo
marathi.freepressjournal.in