परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वालएएनआय

श्रीलंकेला मदतीच्या नावाखाली पाकचा भारताविरोधी कांगावा; 'आरोप हास्यास्पद अन् निराधार'- परराष्ट्र मंत्रालयाचं सडेतोड उत्तर

पाकिस्तानचे आरोप पूर्णपणे निराधार आणि हास्यास्पद आहे. भारताविरुद्ध चुकीची माहिती पसरवण्याचा हा आणखी एक अयशस्वी प्रयत्न आहे.
Published on

नवी दिल्ली : चक्रीवादळग्रस्त श्रीलंकेत मदतीचे साहित्य घेऊन जाणाऱ्या पाकिस्तानच्या विमानाला भारताने आपली हवाई हद्द वापरण्याची तत्काळ मंजुरी दिली होती. मात्र, पाकिस्तानी माध्यमांनी खोट्या बातम्या देत, भारताने श्रीलंकेला मदत साहित्य घेऊन जाणाऱ्या पाकिस्तानी विमानाला त्यांची हवाई हद्द वापरण्याची परवानगी नाकारल्याच्या अफवा पसरवल्या होत्या. भारताने या अफवा सपशेल फेटाळून लावत, “हे दावे निराधार आणि दिशाभूल करणारे” असल्याचे स्पष्ट केले आहे.

पाकिस्तानने भारतीय हवाई हद्दीतून उड्डाण करण्याची विनंती सोमवारी दुपारी केली होती. चक्रीवादळग्रस्त श्रीलंकेला मदत करण्यासाठी पाकिस्तानने केलेल्या विनंतीचा उद्देश लक्षात घेता, भारताने याला परवानगी देण्याचा निर्णय घेतला होता. सोमवारी सायंकाळी अधिकृतपणे परवानगी देण्यात आली आणि पाकिस्तान सरकारला तसे अधिकृतपणे कळवण्यात आले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

"१ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १ वाजता पाकिस्तानकडून इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालयामार्फत ओव्हरफ्लाइट क्लीयरन्सची विनंती प्राप्त झाली. श्रीलंकेतील गंभीर पूर परिस्थिती लक्षात घेता, भारत सरकारने त्याच दिवशी संध्याकाळी ५:३० वाजता (फक्त ४.५ तासांत) परवानगी दिली. पाकिस्तानचे आरोप पूर्णपणे निराधार आणि हास्यास्पद आहे. भारताविरुद्ध चुकीची माहिती पसरवण्याचा हा आणखी एक अयशस्वी प्रयत्न आहे." असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी मंगळवारी स्पष्ट केले.

पाकिस्तानचा कांगावा

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने सोशल मीडियावर दावा केला होता की "भारत श्रीलंकेला जाणारी पाकिस्तानची मानवतावादी मदत रोखत आहे" आणि त्यांचे विमान "६० तासांहून अधिक काळ वाट पाहत आहे." भारताने दिलेली आंशिक परवानगी "व्यावहारिकदृष्ट्या निरुपयोगी" होती कारण ती फक्त काही तासांसाठी होती आणि परतीच्या उड्डाणासाठी वैध नव्हती, असेही पाकने म्हटले होते. त्यानंतर पाकिस्तानी माध्यमांनीही खोडसाळपणा करत, श्रीलंकेला मदत घेऊन जाणाऱ्या विमानाला भारतीय हवाई हद्दीतून उड्डाण करण्यास नकार दिल्याच्या बातम्या प्रसारित केल्या होत्या.

दरम्यान, एप्रिल महिन्यात झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरनंतर भारताने पाकिस्तानसाठी आपली हवाई हद्द बंद केली होती, तर पाकिस्ताननेही भारतासाठी त्यांची हवाई हद्द बंद केली होती. पण, भारताने श्रीलंकेच्या नागरिकांना मदत व्हावी या दृष्टीने पाकिस्तानला आपल्या हवाई हद्दीतून विमान उड्डाणाची परवानगी दिली.

logo
marathi.freepressjournal.in