"भारताने पुन्हा केले इस्त्रायली ड्रोनद्वारे हल्ले, लाहोर ते कराचीपर्यंत ९ शहरांवर साधला निशाणा"; बिथरलेल्या पाकिस्तानचा दावा

भारताने इस्त्रायली बनावटीच्या ‘हेरॉप ड्रोन्स’ (Harop Drones) चा वापर करीत बुधवारी रात्रीही आमच्या अनेक ठिकाणांवर हल्ला केला, असा नवा दावा पाक लष्कराने केला आहे. त्यांनी या कारवाईला गंभीर पातळीवरील चिथावणी असल्याचे देखील म्हटले.
पाक लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी
पाक लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरीफोटो - एक्स
Published on

भारताने मंगळवारी रात्री पाकिस्तानात घुसखोरी न करता स्वतःच्या हद्दीतून पीओकेसह पाकिस्तानमधील ९ दहशतवादी ठिकाणांवर क्षेपणास्त्र हल्ला केला होता. त्यानंतर आता पाकिस्तानने नवा दावा केला आहे की, बुधवारी रात्रीही भारताने त्यांच्या अनेक ठिकाणांवर हल्ला केला.

पाकिस्तान आर्मीने गुरुवारी दुपारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पाक लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी, भारताने इस्त्रायली बनावटीच्या ‘हेरॉप ड्रोन्स’ (Harop Drones) चा वापर करत आमच्यावर हल्ला केला, असा दावा केला.

९ पाक शहरांवर ड्रोन हल्ल्याचा आरोप

लाहोर, कराची, गुजरांवाला, चकवाल, रावळपिंडी, बहावलपूर, मियांवाली आणि चोर शहरांमध्ये हे हल्ले झाले, असे चौधरी म्हणाले. तसेच, त्यांनी १२ हेरॉप ड्रोन्स पाडल्याचा दावा केला असून, त्यातील काही लाहोर आणि कराचीमध्ये पाडले गेले, असेही त्यांनी सांगितले. त्यासोबत काही ड्रोनचे फोटोही दाखवण्यात आले, मात्र त्याची सत्यता पडताळणी झालेली नाही.

गंभीर पातळीवरील चिथावणी

पाक लष्कराने या कारवाईला गंभीर पातळीवरील चिथावणी असल्याचे म्हटले. चौधरी म्हणाले की, हा उघडपणे चिथावणी देण्याचा प्रकार असून आमची सेना संपूर्णपणे सज्ज आहे.

दरम्यान, पाकिस्तानने अमृतसर आणि भोवतालच्या भागांवर ड्रोन व क्षेपणास्त्रांद्वारे हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता, जो भारताने यशस्वीपणे हाणून पाडला. अमृतसरमधील काही शेतांमध्ये पाकिस्तानी ड्रोन्स आणि मिसाइलांचे तुकडे सापडले आहेत. आज भारतीय लष्कराचे अधिकारी घटनास्थळी पोहोचून त्यांची तपासणी करत आहेत.

हेरॉप ड्रोन्सबाबत माहिती

  • हे ड्रोन इस्त्रायलच्या MBT मिसाइल डिव्हिजन या कंपनीने बनवले असून, ही कंपनी Israel Aerospace Industries ची एक शाखा आहे.

  • हे ड्रोन टार्गेट अटॅक करण्यासाठी डिझाइन केले गेले आहेत, त्यात ते माहिर आहेत.

  • हे ड्रोन शत्रूच्या एअर डिफेन्स सिस्टिम नष्ट करण्यास सक्षम आहेत.

  • यामध्ये छोट्या क्षमतेचे मिसाइल असते.

  • हे पूर्णपणे ऑटोमेटिक किंवा सेमी-मॅन्युअल प्रकारेही ऑपरेट करता येतात.

  • भारत आणि अझरबैजानने यांची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली आहे.


logo
marathi.freepressjournal.in