नवी दिल्ली : भारताने बांगलादेशचे उच्चायुक्त नुरल इस्लाम यांना सोमवारी समन्स बजावले व बीएसएफकडून सीमेवर उभारण्यात येत असलेले कुंपण कायदेशीर असून त्याबाबत सर्व प्रोटोकोल पाळण्यात आल्याचे स्पष्ट केले. याआधी रविवारी बांगलादेशने भारतीय उच्चायुक्त प्रणय वर्मा यांना समन्स बजावले होते व बीएसएफकडून करण्यात येत असलेले कुंपण बेकायदेशीर असल्याचे सांगून त्याबाबत चिंता व्यक्त केली होती.
द्विपक्षीय कराराचे उल्लंघन करून भारत बांगलादेश सीमेवर ५ ठिकाणी कुंपण उभारण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप बांगलादेशने केला आहे. बांगलादेशच्या सरकारी वृत्तसंस्थेने सांगितले की, भारतीय उच्चायुक्तांनी बांगलादेशचे परराष्ट्र सचिव जशीम उद्दीन यांच्याशी या विषयावर चर्चा केली.
मात्र, बांगलादेशच्या अंतरिम सरकारने याप्रकरणी कोणतेही वक्तव्य जारी केलेले नाही. भारतीय उच्चायुक्तांनी बैठकीनंतर सांगितले की, दोन्ही देशांनी सुरक्षेच्या मुद्द्यावर कुंपण उभारण्याचे मान्य केले आहे. या मुद्द्यावर दोन्ही देशांच्या सुरक्षा दलांनी (बीएसएफ आणि बीजीबी) चर्चाही केली आहे.