
वॉशिंग्टन : भारत आमच्यावर १०० टक्के आयात शुल्क (टॅरिफ) लादतो हा योग्य निर्णय नाही. आम्हीही येत्या २ एप्रिलपासून भारतावर आयात शुल्क लादणार आहोत. यापुढे जो देश अमेरिकेवर आयात शुल्क लादेल, त्या देशावर आमेरिकाही तितकेच आयात शुल्क लादेल. येत्या २ एप्रिलपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी संसदेच्या संयुक्त सत्राला संबोधित करताना जाहीर केले.
डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी संसदेच्या संयुक्त सत्राला प्रथमच संबोधित केले. ट्रम्प यांनी मेक्सिको, चीन, युक्रेन व भारत या देशांना आपल्या भाषणात इशारा दिला.
अमेरिकेला युद्ध हवे असेल तर आम्ही लढण्यास तयार-चीन
आयात शुल्क युद्ध असो, व्यापारयुद्ध असो किंवा इतर कोणत्याही प्रकारचे युद्ध असो, अमेरिकेला युद्ध हवे असेल तर आम्ही शेवटपर्यंत लढण्यास तयार आहोत, अशा शब्दांमध्ये चीनने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर पलटवार केला आहे. आमच्याकडून अतिरिक्त आयात शुल्क घेणाऱ्या देशांवर आम्हीही तेवढाच कर लादणार असून २ एप्रिल २०२५ पासून याची अंमलबजावणी करण्यात येईल, असे स्पष्ट करत चिनी वस्तूंच्या आयातीवर २० टक्के कर लावण्यात येणार असल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन संसदेतील भाषणावेळी केली. या घोषणेवर चीनने जोरदार पलटवार केला आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, चीन धमकीला भीक घालत नाही. चीनने केलेल्या करवाढीचा प्रतिहल्ला सहन करणे अमेरिकेसाठी सोपे जाणार नाही. अमेरिकन जनता किमतींमध्ये झालेली मोठी वाढ सहन करण्यास तयार आहे का, असा सवाल तज्ज्ञ करीत आहेत.